ऑनलाइन बैलजोडी खरेदी पडली महागात; शेतकऱ्याला एक लाखाला चुना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 01:31 PM2023-01-23T13:31:53+5:302023-01-23T13:32:14+5:30

कुठलीही वस्तू किंवा साहित्य ऑनलाइन खरेदी करताना आधी खातरजमा केली पाहिजे.

Buying bullocks online became expensive; one lakh looted to the farmer | ऑनलाइन बैलजोडी खरेदी पडली महागात; शेतकऱ्याला एक लाखाला चुना

ऑनलाइन बैलजोडी खरेदी पडली महागात; शेतकऱ्याला एक लाखाला चुना

googlenewsNext

बीड : ऑनलाइन खरेदी करताना काळजी न घेतल्यास फसवणुकीची शक्यता आहे. याचा प्रत्यय धारूर तालुक्यातील कारी येथील शेतकऱ्यास १९ जानेवारीला आला. फेसबुकवर जाहिरात पाहून शेतकऱ्याने बैलजोडी मागविली. त्यानंतर सायबर गुन्हेगाराने चालाखीने त्यांच्याकडून ९५ हजार रुपये उकळले. याबाबत सायबर ठाण्यात तिघांवर फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद झाला.

ज्ञानेश्वर दगडू फरताडे (रा. कारी, ता. धारूर) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. १९ जानेवारीला त्यांनी फेसबुकवर बैलजोडीचा फोटो पाहिला. ही बैलजोडी विक्रीला असल्याची जाहिरात होती. त्यावरील मोबाइलवर फरताडे यांनी संपर्क केला. समोरील भामट्याने फरताडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शासकीय वाहनाने बैलजोडी पाठवितो, त्यासाठी वेगवेगळे शुल्क भरावे लागतात, असे सांगून त्यांच्याकडून
९५ हजार १४४ रुपये ऑनलाइन पद्धतीने उकळले. मात्र, तरीही बैलजोडी आलीच नाही. संबंधित क्रमांकावर संपर्क केला असता, प्रतिसाद मिळेना. त्यामुळे फरताडे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यापारी व एक अनोळखी वाहन चालक, अशा तिघांवर गुन्हा नोंद झाला. तपास पोनि शीतलकुमार बल्लाळ करीत आहेत.

ऑनलाइन खरेदी करताना घ्या काळजी
कुठलीही वस्तू किंवा साहित्य ऑनलाइन खरेदी करताना आधी खातरजमा केली पाहिजे. अधिकृत व विश्वसनीय संकेतस्थळ व वेबसाईटवर जाऊनच ऑर्डर करावी. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवत आर्थिक व्यवहार करू नये.
- शीतलकुमार बल्लाळ, पोलिस निरीक्षक, सायबर सेल, बीड

Web Title: Buying bullocks online became expensive; one lakh looted to the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.