चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडले पण आत छदामही नव्हता ! वाचा कुठे झाली ही चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 01:20 PM2022-02-22T13:20:53+5:302022-02-22T13:22:55+5:30
चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून दोन पैक्की एका चोराची पटली ओळख
केज ( बीड ) : चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडली मात्र, त्यात रोकड नसल्याने पुढील अनर्थ टळल्याची घटना केज येथे आज पहाटे ४ वाजेच्या दरम्यान कानडीरोड येथे घडली. दरम्यान, एटीएम समोरील सीसीटीव्हीमध्ये दोन चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत.
या बाबतची माहिती अशी की, केज शहरातील मध्यवर्ती भागातील कानडी रस्त्यालगत महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास दोन चोरटे यात शिरले. आत येताच पहिल्यांदा एका चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेरा स्प्रे मारून बंद केला.त्यांनतर गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडली. मात्र,मशीनमध्ये रोकड नसल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, चोरटे एटीएम फोडत असल्याचे लक्षात येताच बँक कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, त्यांनी पोलिसांनी एटीएम सेंटरचा जुना पत्ता दिला. यामुळे जुन्या स्थळी जाऊन कानडी रोडवरील नव्या सेंटरवर पोलिसांना येण्यास वेळ लागला. यात चोरटे तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी करत कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पुढील तपास सुरु असून एका आरोपीची ओळख पटली असल्याची माहिती आहे.