'कोणाला विचारून टेंडर भरले', युवक काँग्रेस सचिवावर बीडमध्ये रोखले पिस्तूल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 12:09 PM2022-04-04T12:09:20+5:302022-04-04T12:11:31+5:30
गुत्तेदारीच्या कारणावरून हा प्रकार झाला असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बीड : कोणाला विचारून टेंडर भरले, असे म्हणत फोन करून बोलावून घेत युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल रावसाहेब टेकाळे यांना धमकावत पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता जालना रोडवर घडला. याप्रकरणी तिघांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
राहुल टेकाळे (वय ३०, रा. नागापूर बु. ता. बीड, हमू, विठ्ठल साई प्रतिष्ठानमागे, बीड) यांच्या तक्रारीनुसार ते २ रोजी सायंकाळी घरी होते. ५ वाजून २४ मिनिटाला त्यांच्या मोबाईलवर संतोष पवार याचा मिसकॉल आला होता. ६ वाजून ७ वाजता टेकाळे यांनी त्यास कॉल केला असता थेरला गावचे टेंडर कोणाला विचारून भरले, असे तो म्हणाला. त्यानंतर जालना रोडवर येण्यास सांगितले. राहुल टेकाळे हे पायी जालना रोडवर गेले. यावेळी संतोष पवार तेेथे आला. त्याने अनोळखी दोघांना तेथे बोलावून घेतले. यावेळी अनोळखी दोघांनी राहुल टेकाळे यांचे हात पकडले, तर संतोष पवार याने जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल रोखले. यानंतर राहुल टेकाळे यांनी शिवाजीनगर ठाणे गाठले. रात्री उशिरा संतोष पवार याच्यासह अन्य दोन अनोळखींवर खुनाचा प्रयत्न व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपास सहायक निरीक्षक भारत काळे करीत आहेत. आरोपी फरार असून, शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
टेंडर परत न घेतल्यास जिवे मारण्याची धमकी
संताेष पवार याने पिस्तूल रोखल्यावर राहुल टेकाळे यांनी हाताला झटका देत तेथून धूम ठोकली. तेव्हा संतोष पवार याने थांब, कोठे जातो तुला उचलून आणील, टेंडर परत न घेतल्यास ठार मारीन, अशी धमकी दिली. संपूर्ण कुटुंबास संपविण्याची धमकीही दिली.