केज, धारूरमध्ये दिवसा ४ घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:06 AM2019-07-24T00:06:28+5:302019-07-24T00:07:00+5:30
जिल्ह्यातील केज आणि धारुर तसेच आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे चोरट्यांनी भरदिवसा घरांना लक्ष्य केले. एकूण पाच घरे फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
बीड : जिल्ह्यातील केज आणि धारुर तसेच आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे चोरट्यांनी भरदिवसा घरांना लक्ष्य केले. एकूण पाच घरे फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. या घटनांचा तपास करण्यासह चोऱ्यांचे सत्र थांबविण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
मंगळवारी केज शहरातील गजबजलेल्या वस्तीत असलेल्या तीन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी दिवसाढवळ्या लाखोंचा ऐवज लंपास केला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार महिन्यांपूर्वी शहरातील उमरी रोड भागातील तीन घरांचे भरदिवसा कुलूप तोडून चोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला हाता. त्या घटनांचा तपास लागतो न लागतो तोच मंगळवारी पुन्हा शहरातील धारूर रोड भागातील सारस्वत कॉलनीमधील सुरज सोनवणे यांच्या घराचे कुलूप तोडले. चोरट्यांनी घरातील सोन्याच्या सहा अंगठ्या, एक तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याचे लॉकेट, कर्णफुले व नगदी १७ हजार असा अडीच ते तीन लाखांचा ऐवज लंपास केला. तर त्याच दरम्यान माधवनगर भागातील दीपक नान्नजकर यांच्या घरातून नगदी १५ हजार रूपये तर दिनकर पवार यांच्या घरातून नगदी ३ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान सदरील घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांनी घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते.
धारूर शहरातील कसबा भागात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास भर दिवसा घरफोडी झाली. चोरट्यांनी सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास केला. चोरटे दुचाकीवर आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. कसबा भागातील नागनाथ शिनगारे यांच्या घरी चोरी झाली. दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून (क्र. एम.एच.४४ जे ७६३९) आले होते. घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व नगदी रक्कम मिळून दोन लाख १७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तपास पोउपनि सुरेश माळी हे करत आहे.
डोंगरगणमध्ये कुटुंब शेतात चोरांनी घर फोडले
कडा : घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्याने घराचे कुलूप तोडून तीन तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. मंगळवारी भरदुपारी ही घटना आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे घडली. डोंगरगण येथे चव्हाण वस्तीवर रस्त्यालगत माजी सरपंच जालिंदर नानाभाऊ चव्हाण यांचे घर आहे. चव्हाण हे कडा येथे कामानिमित्त गेले होते. तर सदस्य शेतातील पिकांची खुरपणी करत होते.
मंगळवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास अज्ञात चोरटयÞांनी दरवाज्याचे कुलूप तोडून सामान उचकले. घरातील तीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. भरदिवसा रस्त्यालगतचे घर फोडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंभोरा ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.