केज, परळी, नेकनूर आरोग्य संस्थेने गाठले ‘लक्ष्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:04 AM2019-10-24T00:04:08+5:302019-10-24T00:04:25+5:30
प्रसुतीचा वाढता टक्का आणि महिला व प्रसुतीसंदर्भातील सुविधांचा आढावा घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांनी ‘लक्ष्य’ या योजनेत प्रमाणपत्र पटकावले आहे.
बीड : प्रसुतीचा वाढता टक्का आणि महिला व प्रसुतीसंदर्भातील सुविधांचा आढावा घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांनी ‘लक्ष्य’ या योजनेत प्रमाणपत्र पटकावले आहे. नेकनूर स्त्री रुग्णालयासह केज व परळी उपजिल्हा रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. तसेच बीड जिल्हा रुग्णालय आणि गेवराई उपजिल्हा रुग्णायालयाची तपासणी बाकी असून त्यांनीही प्रमाणपत्रासाठी कंबर कसली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात आरोग्य विभागाने विविध योजना आणि उपक्रमांमध्ये मान उंचावली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांच्या समन्वयाचा सन्मानही आयुक्त अनुपकुमार यादव यांनी नुकताच केला आहे. कायाकल्पमध्ये यश पटकावल्यानंतर बीड जिल्ह्यातील बीड जिल्हा रुग्णालय, नेकनूर स्त्री रुग्णालयासह केज, परळी आणि गेवराई उपजिल्हा रुग्णालयाने लक्ष्य या उपक्रमात सहभाग नोंदविला होता. जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील समितीने तपासणी केल्यानंतर परळी, केज उपजिल्हा रुग्णालय आणि नेकनूर स्त्री रुग्णालयाला यशस्वी झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. आता केवळ जिल्हा रुग्णालय आणि गेवराई उपजिल्हा रुग्णायालयाची तपासणी राष्ट्रीय समितीकडून बाकी असून त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत.
दरम्यान, हे प्रमाणपत्र पटकावणाऱ्यांना निधी स्वरूपात बक्षीस दिले जाते. उपजिल्हा, स्त्री आणि ग्रामीण रुग्णालयांना दोन लाख रुपयांचा निधी दिला जातो. तर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांना तीन लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी पटकाविण्यासह कारभार सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्ति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाबासाहेब ढाकणे यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारीका यासाठी परिश्रम घेत आहेत.
अंबाजोगाई एसआरटी, माजलगाव रुग्णालयाचा सहभाग
गतवर्षी पाच संस्थांची निवड झाल्यानंतर यावर्षी अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय आणि माजलगाव ग्रामीण रुग्णालयाने यात सहभाग नोंदविला आहे. या दोन्ही रुग्णालयात महिला व मातांच्या दृष्टीने सुविधा पुरविल्या जातात. तसेच प्रसुतीचा आकडाही मोठ्या प्रमाणात आहे. हे दोन्ही रुग्णालय प्रमाणपत्र पटकावण्यासाठी परिश्रम घेत आहेत.