केज तालुक्यात २६८१ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:33 AM2021-04-27T04:33:50+5:302021-04-27T04:33:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केज शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतानाच आतापर्यंत दोन हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केज शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतानाच आतापर्यंत दोन हजार ६८१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी ‘लोकमत’ला दिली.
केज तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना लागण झालेल्या व सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना केज शहरातील पिसेगाव येथील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. त्यानंतरही तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शारदा इंग्लिश स्कूलमध्ये २०० खाटांचे कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे. ज्या रुग्णांना कोरोनाची मध्यम लक्षणे आहेत व ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांना लोखंडी सावरगाव येथील डेडिकेटर कोविड हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करून उपचार करण्यात येतात. तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढू लागल्याने बनसारोळा येथेही सोमवारपासून कोविड केअर सेंटर चालू केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील नागरिकांनी कोरोना रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील तीन हजार ७२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर आतापर्यंत दोन हजार ६८१ कोरोना रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
तालुक्यातील ९७२ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार चालू आहेत. आतापर्यंत तालुक्यातील ७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली.
आठ ठिकाणी चाचणी केंद्रे
केज तालुक्यातील नागरिकांची कोरोना तपासणी करण्यासाठी तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसह नांदूर घाट येथील ग्रामीण रुग्णालय व केज येथील उपजिल्हा रुग्णालयात एक असे मिळून तालुक्यात एकूण आठ कोविड तपासणी केंद्रे आहेत.