केज मतदार संघाला विकासाचे ‘मॉडेल’ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:31 AM2019-10-15T00:31:02+5:302019-10-15T00:32:10+5:30
केज मतदार संघाला विकासाचे मॉडेल बनविण्याची ग्वाही अशी ग्वाही केज विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली.
अंबाजोगाई : राजकारणात मी नवीन नाही तर गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघात सक्रियपणे कार्यरत आहे. मतदार संघाचे सर्व प्रश्न व समस्या मला पूर्णत: ज्ञात आहेत. त्या समस्या मार्गी लावून मतदार संघाची विकासात्मक वेगळी ओळख आपण निर्माण करणार आहोत, केज मतदार संघाला विकासाचे मॉडेल बनविण्याची ग्वाही अशी ग्वाही केज विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली.
केज तालुक्यात विविध ठिकाणी नमिता मुंदडा यानी सभांमधून मतदारांना आवाहन केले. तसेच कॉर्नर बैठकांमधून मतदारांशी संवाद साधला. नमिता मुंदडा म्हणाल्या, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना नव्याने आलेल्या नेत्यांनी आम्हाला मोठा त्रास दिला. राजकारणातून आम्हाला संपविण्याची भाषा होऊ लागली. तरीही आम्ही जनतेच्या पाठबळावर खंबीर उभे राहून लोकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत होतो. मात्र, पक्षविरोधी कारवायांना कंटाळून आपण भाजपामध्ये प्रवेश केला. पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांचे सक्षम नेतृत्व स्वीकारले. मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढणार आहोत. रात्रंदिवस तुमच्या सेवेसाठी मी तत्पर राहीन. तुम्ही मला संधी द्या, असे आवाहन नमिता मुंदडा यांनी ठिकठिकाणच्या सभांमधून व बैठकांमधून केले.
वॉटरग्रीडच्या माध्यमातून मांजरा धरणात पाण्याची व्यवस्था- अक्षय मुंदडा
पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा समावेश वॉटरग्रीडमध्ये करण्याचे ठरविले आहे. शासनाने या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
आगामी काळात उजनी धरणातून मांजरा धरणात पाणी आणण्याची व्यवस्था वॉटरग्रीडच्या माध्यमातून करणार असल्याची ग्वाही अक्षय मुंदडा यांनी ठिकठिकाणी झालेल्या सभांमधून दिली. पंकजा मुंडे यांचे नेतृत्व हे विकास साध्य करणारे नेतृत्व आहे. या पाठबळावरच केज मतदार संघाचा विकासात्मक कायापालट करणार असल्याचे अक्षय मुंदडा म्हणाले.