फोटो व्हायरलची धमकी देत घरी बोलावले; ब्लॅकमेलींगला कंटाळून विवाहितेने जीवन संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 12:45 PM2021-10-22T12:45:58+5:302021-10-22T13:01:40+5:30
married woman commit suicide due to blackmailing : पिता-पुत्रावर ॲट्राॅसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
परळी : लग्नाचे आमिष दाखवून एका नवविवाहितेचे फोटो काढले, ते व्हायरल करण्याची धमकी देत बोलणे चालू ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. त्यामुळे त्रासलेल्या महिलेने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या ( married woman commit suicide due to blackmailing ) केली. ही खळबळजनक घटना तालुक्यातील आनंदवाडी येथे ७ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी तरुणसाह त्याच्या वडिलावर ॲट्राॅसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा २० ऑक्टोबर रोजी नोंद करण्यात आला.
मयत तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, पतीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे त्यांची २२ वर्षीय मुलगी मागील तीन वर्षांपासून माहेरीच राहत होती. पाच महिन्यांपूर्वी ती शिक्षणासाठी लातूरला गेली. तिथे पांडुरंग उद्धव नागरगोजे (रा. आनंदवाडी शिवार, ता. परळी) याच्यासोबत तिची ओळख झाली. आम्हा दोघात प्रेम असून लग्न करणार असल्याचे तिने एक महिन्यापूर्वी वडिलांना फोन करून सांगितले. त्यानंतर पांडुरंग मानसिक त्रास देऊ लागल्याने तिने त्याला बोलणे बंद केले.
तेंव्हा पांडुरंगने तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बोलण्यासाठी जबरदस्ती सुरु केली आणि तिला गावाकडे बोलावू लागला. त्यामुळे ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ती पांडुरंगच्या गावी गेली. तिथून पांडुरंग तिला घेऊन घरी गेला असता त्याचे वडील उद्धव याने तू एका विशिष्ट जातीची मुलगी घरी का घेऊन आलास असा जाब विचारला आणि तिला हाकलून दे म्हणाले. पांडुरंगनेही तिला हाकलून दिले. त्यांना विनवण्या करून ती तिथेच राहिली. रात्रीतून तिने विषारी द्रव प्राशन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी पांडुरंगने तिला स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे उपचारादरम्यान ८ ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. पांडुरंग आणि उद्धव नागरगोजे या दोघांवर परळी ग्रामीण ठाण्यात ॲट्राॅसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.