वय झाले, पण नोकरी मिळाली नाही, तत्काळ अनुकंपा भरती करा
By शिरीष शिंदे | Published: April 24, 2023 07:53 PM2023-04-24T19:53:23+5:302023-04-24T19:53:34+5:30
उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर कैफियत मांडत केले निवेदन सादर
बीड : जिल्ह्यातील अनेक तरुणांची नावे अनुकंपाधारकांच्या यादीत असून, १० ते १२ वर्षांपासून हे तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही जणांचे तर वय झाले आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील अनुकंपाधारकांनी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे करीत निवेदन सादर केले.
अनुकंपाधारकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील अनुकंपा सामाईक प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना फेब्रुवारी २०२३ या महिन्यात सर्व विभागांच्या रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यानंतर अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. जिल्हाधिकारी सामायिक यादीमधून नाशिकमध्ये १२७ अनुकंपाधारकांची नियुक्ती केली आहे. बीड जिल्हा सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीतील अनुकंपा उमेदवार असून, मागील अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
रिक्त पदांचा आढावा घ्यावा
पुणे, कोल्हापूर, नांदेड, परभणी, लातूर, नाशिक व इतर जिल्ह्यांत सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीतून पात्र उमेदवारांना नोकरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातही सर्व विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत घ्यावे, त्यांच्या वयाचा विचार करता एजबार होण्यापूर्वी सेवेत घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील अनुकंपाधारकांनी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे करीत निवेदन सादर केले.