अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:41 AM2019-09-25T00:41:32+5:302019-09-25T00:42:30+5:30

बीड पालिकेने आता अनधिकृत बांधकाम धारकांवर कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे

A campaign to crack down on unauthorized construction | अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम

अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड पालिकेने आता अनधिकृत बांधकाम धारकांवर कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. पंधरा दिवसापूर्वीच एकावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता आणखी सात ते आठ लोकांवर अनधिकृत बांधकाम केल्याचा गुन्हा दाखल होणार आहे. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी बीड शहर पोलिसांना मंगळवारी पत्रही दिले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
हुमेरा जबीन जमील आहेमद खान व इतर सहा ते सात (सर्व रा.कारंजा रोड, बीड) यांनी बीड पालिकेकडून रितसर परवानगी घेऊन बांधकाम (घर क्र.१-८-८४) करण्यास सुरूवात केली होती. मात्र, परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केले जात असल्याचा प्रकार स्थळ पाहणीतून स्वच्छता निरीक्षकांच्या लक्षात आला. त्यानंतर २७ जुलै रोजी प्र.स्वच्छता निरीक्षक सहायक रचनाकार अंकुश लिमगे यांनी स्थळ पाहणी केली. ११ सप्टेंबर रोजी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली. मात्र, नोटीस घेण्यास नकार दिला. त्यानंतर पंचासमक्ष पुन्हा नोटीस दिली. त्यांनी नोटिसीनुसार अनधिकृत बांधकाम न पाडता ते पुन्हा चालूच ठेवले. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३(१) (बी) अन्वये त्यांनी कायद्याचे उल्लंघण केल्याचे सिद्ध झाले. हा सर्व प्रकार सीओ रोहिदास दोरकुळकर यांना समजल्यावर तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना दिले. त्याप्रमाणे बीड शहर पोलिसांना पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. प्र.स्वच्छता निरीक्षक स्वाती कागदे या फिर्याद देणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
अनधिकृत बांधकामांवर विशेष नजर
बीड शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. आता ही बांधकामे शोधण्यासाठी स्वाती कागदे यांची स्वतंत्र नेमणूक केली आहे. केवळ अनधिकृत बांधकामे शोधून त्याचा अहवाल तयार करणे, व कारवाईची शिफारस करणे, एवढेच काम त्यांना देण्यात आले आहे. तसे आदेशही मुख्याधिका-यांनी काढले आहेत.

Web Title: A campaign to crack down on unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.