मानवलोककडून ४०० किलोमीटर लांबीचे कॅनॉल स्वच्छतेचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:20 AM2021-02-05T08:20:33+5:302021-02-05T08:20:33+5:30
अंबाजोगाई : मानवलोक व शासन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जलसंधारणाच्या कामात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मानवलोकचे कार्यवाह अनिकेत ...
अंबाजोगाई : मानवलोक व शासन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जलसंधारणाच्या कामात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांचा गौरव करण्यात आला. नांदेड पाटबंधारे विभागीय कार्यालयांतर्गत मानवलोक परिवाराच्या वतीने कॅनॉल व सबमायनरमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षीसुद्धा मानवलोकने जवळपास चारशे किलोमीटर लांबीच्या कॅनॉल व सबमाइनर लाइन स्वच्छतेचे काम केले होते. त्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांचा नुकताच सन्मान केला.
येलदरी व सिद्धेश्वर धरणांच्या कॅनॉलच्या सबमाइनरची स्वच्छता करण्यासाठी पूर्णा पाटबंधारे विभाग ता. वसमत, जि. हिंगोली यांच्या मागणीप्रमाणे सात जेसीबी मशीन मानवलोक परिवारातर्फे पुरवण्यात आल्या आहेत. नादुरुस्त असलेल्या ४५० किलोमीटर सबमाइनरची स्वच्छता करण्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या कालवा स्वच्छतेमुळे हिंगोली, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यांतील २०६ गावांची ५७९८८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळेत, समन्यायी व मुबलक पाणी उपलब्ध झाल्यावर रब्बी पिकाच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे.