बीड जिल्ह्यातला लॉकडाऊन रद्द करा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:34 AM2021-04-04T04:34:33+5:302021-04-04T04:34:33+5:30
बीड : गेल्या वर्षभरापासून शासन-प्रशासनाकडून लावण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनता पार मेटाकुटीस आली असून सर्वांची यातून सुटका ...
बीड : गेल्या वर्षभरापासून शासन-प्रशासनाकडून लावण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनता पार मेटाकुटीस आली असून सर्वांची यातून सुटका व्हावी. आर्थिक विवंचनेतून सर्वांनी बाहेर पडावे. याकरिता आता लॉकडाऊन रद्द करा अन्यथा जनहितास्तव एआयएमआयएम पक्ष मोर्चा काढेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफिक यांनी दिला आहे.
लॉकडाऊन रद्द करण्यासोबतच वीज बिल माफ करण्यात यावे, वीज कनेक्शन न कापता सक्तीची वसुली बंद करण्यात यावी, लॉकडाऊनमुळे मार्च २० पासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेला आर्थिक मदत देण्यात यावी, अशा अन्य मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. २६ मार्च २१ पासून प्रशासनाकडून लॉकडाऊन लावण्यात येत आहे. याचा छोटे-छोटे व्यापारी, मोलमजुरी करणारे कामगार-श्रमिक, रिक्षाचालक, हातगाडी चालक, फळ-भाजी विक्रेते या सर्वांच्या अर्थार्जनावर विपरित परिणाम पडला आहे. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून लावण्यात येणाऱ्या वारंवारच्या लॉकडाऊनमुळे हे सर्वजण आर्थिकदृष्ट्या पार डबघाईस आले आहे. अशा अवस्थेमध्ये जिल्हा प्रशासनाने पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन लावल्याने यात अजून जास्त भर पडली आहे. म्हणून जनतेची होत असलेली आर्थिक कुचंबणा दूर करण्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाऊन रद्द करण्यात यावे किंवा सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत उद्योग व व्यापार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी भूमिका एआयएमआयएम पक्षाची सुरुवातीपासून आहे.
प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज़ जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.अब्दुल गफार कादरी, मराठवाडा विभागीय अध्यक्ष फिरोज़ खान लाला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पक्ष, सर्व संघटना, व्यापारी संघटना, सर्वसामान्य जनतेसोबत चर्चा करून मोर्चाची भूमिका स्पष्ट केली जाईल. सर्वांना सोबत घेत लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफिक यांच्यासह अब्दुस सलाम, हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी, शेख मतीन, मोमिन अजहर, शेख एजाज खन्ना, अकबर कच्छी, सय्यद इलयास आदींची नावे व सह्या आहेत.
ग्राहकांनी थकित वीज बिले दोन ते तीन टप्प्यात भरावी - अधीक्षक अभियंता
महावितरण कंपनीला वीज बिलासंदर्भात एआयएमआयएम पक्षाने तिसऱ्यांदा निवेदन देऊन मोर्चाचा इशारा दिला आहे. महावितरण कंपनी ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणार नाही. परंतु ग्राहकांनीही थकित वीज बिले दोन ते तीन टप्प्यात का होईना भरावीत, म्हणजे त्यांनाही त्रास होणार नाही आणि थकीत बिले वसुली चालू राहिल्याने आमच्या कंपनीवरही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, असे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले.