दहा दिवसीय लॉकडाऊन रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:41+5:302021-03-26T04:33:41+5:30
बीड : जिल्हाधिकारी यांनी २६ मार्च ते ४ एप्रिल असा एकूण दहा दिवसांचा जाहीर केलेला बीड जिल्हा लॉकडाऊन रद्द ...
बीड : जिल्हाधिकारी यांनी २६ मार्च ते ४ एप्रिल असा एकूण दहा दिवसांचा जाहीर केलेला बीड जिल्हा लॉकडाऊन रद्द करण्यात यावा. धार्मिक स्थळे ५० टक्के क्षमतेने चालू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गेल्या वर्षभरापासून शासन-प्रशासन घेत असलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे सर्व उद्योग व्यवसाय तोट्यात असून निर्माण झालेल्या स्थितीमुळे व्यावसायिक, शेतकरी,कष्टकरी, कामगार व सामान्य नागरिक निराशेच्या खाईत लोटले गेले आहेत. गेल्या वर्षभरापासून दुकानदारांचे, घर भाडेकरूंचे थकलेले भाडे, कामगारांचा पगार, लाईट बिल भरण्याकरिता सुद्धा जनतेकडे पैसा राहिला नाही. अनेकांनी आपल्या आई, पत्नी यांच्या अंगावरील सोने मोडून किंवा गहाण ठेवून आपली उपजीविका चालवली आहे. अशा अवस्थेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा आता दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घोषित केला आहे. यामुळे सर्वांसमोर रोजगारासह जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य गोरगरिबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. याचा कुठेतरी शासकीय-प्रशासकीय दरबारी सहानुभूती पूर्वक विचार व्हायला हवा. आमचा पक्ष शासन-प्रशासनाने सुरू केलेल्या कोरोना मोहिमेला आजपर्यंत पूर्णपणे सहकार्य करत आलेला आहे. जनतेसाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे होत आहे. तरी सुद्धा अशा प्रकारे जिल्हा लॉक डऊन करणे आता जनतेला परवडणारे नाही, असे शफीक यांनी निवेदनात म्हटले आहे.
लॉकडाऊनचे आदेश मागे घेण्यात यावे. त्याऐवजी नियम कडक करून ते न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. धार्मिक स्थळे पन्नास टक्के क्षमतेने चालू ठेवण्याची परवानगी द्यावी आणि जनतेला राशन, किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुविधा पुरवावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक यांच्यासह अय्युब पठाण, हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी,अब्दुस सलाम सेठ, हाफीज अशफाक, अजहर मोमीन, मुफ्ती वाजेद, अदनान खान, सय्यद इलियास, सोफियान मनियार, शेख इम्रान, शेख नईम, मोहसीन भाई आदी उपस्थित होते.