विड्यात हनुमान जयंतीसह ललित नाट्य कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:33 AM2021-04-27T04:33:34+5:302021-04-27T04:33:34+5:30
केज : कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. विडा परिसरात कोरोना रुग्णसंख्यादेखील वाढत चालली आहे. यामुळे येथे साजरी होणारी हनुमान ...
केज : कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. विडा परिसरात कोरोना रुग्णसंख्यादेखील वाढत चालली आहे. यामुळे येथे साजरी होणारी हनुमान जयंती व ललित नाट्य कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. कोरोनामुळे मागील वर्षीही हा उत्सव झाला नाही. यामुळे यंदाही तिनशे वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.
विडा येथील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यात रामनवमीच्या दिवशी हनुमान सप्ताहाचे आयोजन केेले जाते. आठ दिवस विविध कार्यक्रम सुरू असतो. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावभार हनुमान पालखी सोहळा मिरवणूक होते. यात पालखीसमोर रात्री १२पर्यंत विविध सोंग सादर केले जातात. यात डोंबारी, तृतीयपंथी, आराधी, हत्ती, अस्वल याचा समावेश असतो. पालखीचे हनुमान मंदिराच्या पारावर विसर्जन झाल्यावर रात्री १२ नंतर ललीत नाट्य कार्यक्रमाला सुरुवात होते. हा प्रकार भारतात आसाम, महाराष्ट्रात विडा येथे साजरा केला जातो. यात ब्राह्मण, फकीर, छाडीदार, भालदार, चोपदार, आराधी, सवाल जवाब, राजभट, गावभाट, वाघ्या, मुरुळी, असे विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले जातात.
..
शासनाच्या आदेशाप्रमाणे यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. मंगळवारी सकाळी होणाऱ्या कार्यक्रमात कोणी गर्दी करू नये. शासन आदेशाचे पालन करावे.
-सुरज पटाईत, सरपंच, विडा ग्रामपंचायत
...