आधीच दारिद्रय त्यात कॅन्सरचे निदान; उपचारासाठी पैसे नसल्याने खचलेल्या मजूराने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:42 AM2024-09-19T11:42:41+5:302024-09-19T11:51:07+5:30

मित्रांनी क्राऊड फंडिंगमधून उपचार केले, मात्र त्यानंतरही अधिक उपचारासाठी लागणारे पैसे नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

Cancer diagnosis in poverty already; As there was no money for treatment, the exhausted laborer ended his life | आधीच दारिद्रय त्यात कॅन्सरचे निदान; उपचारासाठी पैसे नसल्याने खचलेल्या मजूराने जीवन संपवले

आधीच दारिद्रय त्यात कॅन्सरचे निदान; उपचारासाठी पैसे नसल्याने खचलेल्या मजूराने जीवन संपवले

- नितीन कांबळे
कडा (बीड) -
गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानेग्रस्त मजूराने पुढील उपचारासाठी पैसे नसल्याने आणि आजारपणाला कंटाळून नैराश्यात राहत्या घरी गळफास घेऊन जिवन संपविल्याची घटना गुरूवारी सकाळी सहाच्या वाजेच्या दरम्यान कडा येथील सुंदरनगर परिसरात घडली. अशोक सुभाष वाडेकर (४३) असे मृताचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील कडा येथील सुंदरनगर येथे राहत असलेले अशोक सुभाष वाडेकर हे मजूरी करत. हातावर पोट असलेल्या अशोक यांना अचानक कॅन्सरचे निदान झाले. मागील काही महिन्यांपासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशी झुंज देत होते. घरी आधीच अठरा विश्व दारिद्रय असल्याने त्यांना कॅन्सरवरील महागडे उपचार कसे होणार याची चिंता सतावत होती. मात्र, ही बाब समजताच मित्रांनी लोक वर्गणी करून त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार केले. येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतरही त्यांना अधिक उपचाराची गरज होती, यासाठी पैसे उभे करण्याचे मोठे आव्हान मजूरी करणाऱ्या अशोक वाडेकर यांच्यासमोर होते. 

मजूरी करून उदरनिर्वाह करणारे वाडेकर हे उपचार सुरू असल्याने काम करू शकत नव्हते. यातच दुर्धर आजार, दीर्घ काळ चालणारे उपचार आणि त्यासाठी पैसे नसल्याने त्यांना नैराश्य आले होते. यास कंटाळून अशोक वाडेकर यांनी आज सकाळी सहा वाजेच्या दरम्यान राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेतला. मृत्यूपूर्व सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहून ठेवले आहे की, ''माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी कॅन्सरचा रुग्ण असून पुढील उपचारासाठी पैसे नसल्याने जीवन संपवत आहे.'' त्यांच्या पश्चात वडिल,भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Cancer diagnosis in poverty already; As there was no money for treatment, the exhausted laborer ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.