उसाच्या शेतात गांजाची लागवड; २२ झाडे जप्त, शेतकरी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 07:44 PM2022-04-18T19:44:10+5:302022-04-18T19:47:04+5:30
गेवराई तालुक्यातील तलवाड्यात गांजाच्या शेतीवर पोलिसांची धाड
गेवराई : तालुक्यातील तलवाडा येथे ऊसाच्या शेतात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर व तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांनी पथकासह धाड टाकली. यामध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील तलवाडा येथील त्वरिता देवी मंदिराच्या पायथ्याशी बाळू अंकुश खवाटे यांची शेती असून त्यांनी ऊसात गांजाची झाडे लावली आहेत. ती सध्या डोक्याऐवढी असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना मिळताच त्यांनी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलवाडा ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांना सोबत घेऊन पथकासह खवाटे यांच्या शेतात धाड टाकली.
यावेळी ऊसाच्या शेतात ठराविक अंतरावर जवळपास 22 गांजाची झाडे जवळपास पाच ते सहा फुट वाढलेली आढळून आली.याचे वजन 18 किलो आहे. हि सर्व झाडे पोलिसांनी जप्त करत आरोपी बाळू खवाटे राहणार तलवाडा यांना ताब्यात घेतले आहे. हि कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलवाडा ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे,उपनिरीक्षक बाळासाहेब भुवर,सचिन अलकट,मंडळ अधिकारी ,तलाठी राहुल गायकवाड सह आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.