नरभक्षक बिबट्या बेफाम, प्रशासनाची तयारी ठरतेय फक्त देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 01:54 PM2020-11-30T13:54:37+5:302020-11-30T13:55:50+5:30
वनविभागाचे नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अनेक पथके तळ ठोकून आहेत.
- नितीन कांबळे
कडा ( बीड ) : सुर्डी, किन्ही, पारगांव येथील तीन जिवाच्या नरडीचा घोट घेऊन बिबट्या बेफाम सुटला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे अनेक पथके परिसरात तैनात आहेत. पण त्या पथकांची तयारी फक्त देखावा ठरत असून हाती काहीच लागत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. तसेच दोन ठिकाणी बिबट्याने सामान्य माणसावर जीवघेणे हल्ले केल्याने आता लोकांना लोक जीव मुठीत घेऊनच बाहेर पडावे लागत आहे.
आष्टी तालुक्यातील सुर्डीत नागनाथ गर्जॅ याच्या नरडीचा घोट घेऊन चार दिवस होत नाही तोच पंधरा किलोमिटर अंतरावर किन्हीत दहा वर्षीय स्वराज भापकर या चिमुकल्याच्या नरडीचा घोट घेतला त्याला तीन दिवस होत नाही तोच वीस किलोमिटर अंतरावर सुरेखा बळे या महिलेच्या नरडीचा घोट घेतला. तर मंगरूळ आणि पारगांव बोराडे वस्तीवरील दोन महिलांवर हल्ला चढवला. यामुळे तालुक्यातील नागरिक भयभीत आहेत. वनविभागाचे नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अनेक पथके तळ ठोकून आहेत. कोंबिग ऑपरेशनसाठी स्वतंत्र पथक, पिजरे लावली, कॅमेरे लावले तरी सुद्धा बिबट्याची शिकार सुरूच आहे.
जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर बिबट्यास लवकरच जेरबंद करू असे आश्वासन देणारा वनविभाग मात्र अपयशी ठरताना दिसत आहे. वनविभागाची एवढी मोठी यंत्रणा असतानाही बिबट्याला पकडता येऊ शकत नसेल तर हा नुसता देखावा ठरत आहेत. यानंतर एखादी दुर्देवी घटना घडली तर वनविभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल असे सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे यांनी सांगितले. पुढील दोन दिवसात बिबट्यास जिवंत पकडणे शक्य नसेल तर परवानगी घेऊन शुटरच्या माध्यमातून त्याला ठार करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.