कोरोनासाठी ११३८ खाटांची क्षमता, २८९ खाटांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:34 AM2021-02-24T04:34:10+5:302021-02-24T04:34:10+5:30

बीड : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहून नव्याने कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार असल्याची ...

Capacity of 1138 beds for corona, patient on 289 beds | कोरोनासाठी ११३८ खाटांची क्षमता, २८९ खाटांवर रुग्ण

कोरोनासाठी ११३८ खाटांची क्षमता, २८९ खाटांवर रुग्ण

Next

बीड : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहून नव्याने कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार असल्याची चर्चा होती. परंतु, सध्या तरी नवे सेंटर उघडण्याची गरज नाही. जिल्ह्यात काेरोनासाठी ११३८ खाटांची क्षमता असून केवळ २८९ खाटांवर रुग्ण आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून सोमवारी देण्यात आली.

जिल्ह्यात गतवर्षी जुलै महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे प्रशासनाने लक्षणे नसणाऱ्यांना विलगीकरण करता यावे, यासाठी कोविड केअर सेंटर सुरू केले होते. बीडमध्येही प्रत्येक तालुक्यात हे सेंटर उघडून तेथे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कक्षसेवक अशी पदे भरली होती. काही महिने या सेंटरमध्येही खूप गर्दी झाली होती. परंतु, डिसेंबर महिन्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने पुन्हा हे सेंटर बंद करून ५० कर्मचारी कपात करण्यात आले. परंतु, आता मागील आठवड्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. असे असले तरी बीडमध्ये आणखी तेवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे नवे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा विचार आताच नसल्याचे सांगण्यात आले.

बीडमध्ये एकमेव सेंटर सुरू

जिल्ह्यात सुरू असलेले सर्व कोविड केअर सेंटर बंद करण्यात आलेले आहेत. सध्या बीडमधील शासकीय आयटीआयमध्ये एकमेव कोविड केअर सेंटर सुरू आहे. येथे १५० खाटांची क्षमता असून मंगळवारी केवळ ६ रुग्ण भरती होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व इतर स्टाफ कार्यान्वित आहे.

कोट

सध्या जिल्ह्यात खाटा रिक्त आहेत. नवे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत वरिष्ठांशी बाेलून निर्णय घेण्यात येईल. आतापर्यंत तरी तसा विचार नाही. रुग्णसंख्या वाढल्यावर पुढील कारवाई केली जाईल.

- डॉ. आर.बी. पवार,

जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

---

एकूण रुग्ण - १८५०२

एकूण कोरोनामुक्त - १७६२९

एकूण मृत्यू - ५७३

----

अशा आहेत खाटा रिक्त

रुग्णालय खाटांची क्षमता मंजूर खाटा रुग्ण

सीसीसी बीड १५० ५० ६

ट्रॉमा केअर, आष्टी ५० ३० १९

जिल्हा रुग्णालय, बीड ३०० १५० ८६

स्वाराती, अंबाजोगाई ३०० १०० १३०

लोखंडी सावरगाव २५० ३० ३५

खासगी रुग्णालये ८८ ८८ १३

एकूण ११३८ ४४८ २८९

Web Title: Capacity of 1138 beds for corona, patient on 289 beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.