आतापर्यंत कपाशीला पाने दिसली असती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:05 AM2019-06-20T00:05:13+5:302019-06-20T00:05:48+5:30
‘मृगाला बरसला असता तर कपाशी दोन पानांवर दिसली असती, आणि पुढची पिके घ्यायला सोपे गेले असते’, अशा प्रतिक्रिया लांबलेल्या पावसाबद्दल शेतकरी व्यक्त करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील सहा महिन्यांपासून टंचाई आणि दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या बीड जिल्ह्याला यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा होती. परंतू जूनचे १९ दिवस झालेतरी पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘मृगाला बरसला असता तर कपाशी दोन पानांवर दिसली असती, आणि पुढची पिके घ्यायला सोपे गेले असते’, अशा प्रतिक्रिया लांबलेल्या पावसाबद्दल शेतकरी व्यक्त करत आहेत.
मागील वर्षी सरारीच्या तुलनेत ५० टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे खरिपाबरोबरच रबीचा हंगामही वाया गेला. डिसेंबरपासून ग्रामीण भागात पाणी टंचाई सुरु झाली. उन्हाळ्यातील चार महिने दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या. तापमानही ४४ अंशापर्यंत गेल्याने यंदाचा उन्हाळा असह्य झाला. त्यामुळे जून कधी येतो आणि पाऊस कधी बरसतो, याची प्रत्येक जण चातकाप्रमाणे वाट पाहत होता. ६-७ जूनदरम्यान मान्सूनपूर्व पावसाने किरकोळ स्वरुपात हजेरी लाली तरीही आशा उंचावल्या होत्या.
खरिप हंगामाची तयारी सुरु केली. मशागती आटोपल्या, मात्र पाऊस नसल्याने शोतकरी चिंतेत आहेत. १९ जूनपर्यंत पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मागील वर्षीदेखील २० जूनपासून पेरण्या सुरु झाल्या होत्या.
मात्र, यंदा १९ जूनपर्यंत पूरक पाऊसच झालेला नसल्याने २० जूनपासून पेरण्यांची आशाही मावळली आहे. त्यात मूग, उडदाचा विषय संपलेला आहे. हवामान खात्याच्या अनुमानानुसार २२ पासून चांगल्या पावसाचा अंदाज आहे. जर तसे झाले तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पेरण्या सुरु होऊ शकतात.
पाऊस लांबल्याने उत्पादकतेवर परिणाम
१ ते १९ जूनदरम्यान मृगाचा पाऊस झाला असता तर कपाशी, मूग, उडदाची लागवड पूर्ण झाली असती. या पावसामुळे सोयाबीन, तूर, मका, बाजरीला पोषक वातावरण राहिले असते. मात्र पाऊस लांबल्याने सोयाबीन, तूर पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, असे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.