नेकनूरजवळ पोलिस अधिकाऱ्याला चिरडरून फरार झालेला कारचालक दारुडा?

By सोमनाथ खताळ | Published: July 9, 2024 12:33 PM2024-07-09T12:33:41+5:302024-07-09T12:34:07+5:30

कारचालक कायम दारूच्या नशेतच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे

Car driver who escaped after crushing a police officer near Neknoor was drunk? | नेकनूरजवळ पोलिस अधिकाऱ्याला चिरडरून फरार झालेला कारचालक दारुडा?

नेकनूरजवळ पोलिस अधिकाऱ्याला चिरडरून फरार झालेला कारचालक दारुडा?

बीड : दिंद्रूड ठाण्याच्या पाेलिस अधिकाऱ्यांना कारने चिरडणारा चालक हा दारुडा असल्याचे समोर आले आहे. अपघात झाल्यानंतर तो फरार झाला असला तरी कार नंबरवरून माहिती घेतली असता तो चाकरवाडीचा रहिवासी आहे. तसेच तो कायम दारूच्या नशेत असून, कार सुसाट वेगाने चालवत असल्याची माहिती मिळाली. रविवारी पहाटेदेखील त्याने दारूच्या नशेतच पोलिस अधिकाऱ्यांना चिरडल्याचा संशय असून, नेकनूर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

श्रीधर नन्नवरे (रा.नन्नवरे वस्ती, ता.बीड) असे मयताचे नाव असून, रमेश नागरगोजे हे जखमी आहेत. दोघेही पोलिस उपनिरीक्षक असून, नन्नवरे हे दिंद्रूड, तर नागरगोजे सिरसाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलिस भरतीप्रक्रियेच्या बंदोबस्तासाठी दुचाकीवरून (एम.एच. २३, ए.के.९३९७) बीडला येत असताना नेकनूरजवळ ७ वाजेदरम्यान त्यांना भरधाव कारने (एम.एच. २३ ,बी.२१०८) राँग साइडला जावून धडक दिली. यामध्ये नन्नवरे ठार, तर नागरगोजे जखमी झाले होते अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला होता.

दरम्यान, पोलिसांनी कारच्या नंबरवरून पुढील माहिती काढली. त्याचे नाव अमर अशोक पवार (वय २५, रा.चाकरवाडी, ता. जि. बीड) असल्याचे समोर आले आहे. तो कायम दारूच्या नशेत असतो. नशेतच कार चालवत असतो. शनिवारी तो पुण्याला गेला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास तो गावी येत असतानाच त्याचा कारवरील ताबा सुटला आणि राँग साइडला कार जाऊन दुचाकीला धडक दिली. त्याच्या पार्श्वभूमीनुसार तो रविवारीदेखील नशेत असण्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली आहे. चाकरवाडीतील त्याच्या काही मित्रांशीही पोलिसांनी संपर्क केला असता तो नशेतच असल्याचे सांगण्यात आले. मयत अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांनी शनिवारी दुपारपर्यंत नेकनूर पाेलिस ठाण्यात तक्रार दिलेली नव्हती.

कार नंबरवरून आरोपीचा शोध
अपघातानंतर कारचालक हा घटनास्थळावरून फरार झाला. कार नंबरवरून त्याचा शोध घेतला जात असून, २५ वर्षांचा पवार नावाचा तरुण असल्याचे समजले. खात्री करून त्याला ताब्यात घेतले जाईल. मयतांच्या नातेवाइकांनी अद्यापतरी तक्रार दिलेली नाही. सर्व विधी पूर्ण केल्यावर ते येतील. संबंधित कारचालकाची माहिती घेतली असता तो कायम दारूच्या नशेतच असतो, असे समजले. रविवारी तो नशेत होता की नव्हता? हे तपास केल्यावरच समजेल.
-चंद्रकांत गोसावी, सहायक पोलिस निरीक्षक, नेकनूर

Web Title: Car driver who escaped after crushing a police officer near Neknoor was drunk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.