केज रोडवरील प्रकार : रस्त्यावर जॅक, स्टेफनी टाकायची अन् वाहन थांबताच त्यांना लुटायचे
By सोमनाथ खताळ | Published: March 7, 2024 08:18 PM2024-03-07T20:18:27+5:302024-03-07T20:18:35+5:30
एलसीबीने एका अल्पवयीन आरोपीला घेतले ताब्यात, तिघे फरार
बीड : केज तालुक्यातील केज-बीड महामार्गावर स्टेफनी, जॅक टाकायचा. हे पाहताच चालक वाहन थांबवतात. वाहन थांबताच दबा धरून बसलेली टोळी या चालकाला पकडून बाजूला नेऊन मारहाण करत असत. त्यांच्याजवळील रोख रक्कम व इतर साहित्य काढून घ्यायचे. याच टोळीतील एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. अजूनही तिघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
२ फेब्रुवारी रोजी केज ते बीड मार्गावर सारूळ जवळ मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास लक्ष्मण आंधळे (वय ५३ रा. सिद्धेश्वर नगर परळी) या टँकर चालकाला दुचाकी आडवी लावून अडविण्यात आले. बाजूच्या शेतात नेऊन त्यांना मारहाण केली. त्यांच्याजवळील रोख साडेचार हजार रुपये, मोबाइल व टँकरमधील २५० लिटर डिझेल त्यांनी काढून घेतले. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. यामधील आरोपी हा पारा (ता. वाशी जि. धाराशिव) येथील असल्याचे समजले.
याच टोळीतील एक अल्पवयीन आरोपी हा गुरुवारी वाट्याला आलेले ६६ लिटर डिझेल विक्री करण्यासाठी नांदुरघाट फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे एलसीबीने सापळा लावला. हा आरोपी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दुचाकी, डिझेल व इतर साहित्य असा ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला आता केज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याचे आणखी तीन साथीदार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या टीमने केली.