बीडमध्ये ५ वर्षांत अडीचशे मुलांवर हृदय शस्त्रक्रिया; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 12:56 PM2017-12-19T12:56:14+5:302017-12-19T12:59:46+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये पाच वर्षांत तब्बल अडीचशे मुलांवर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर अपेंडिक्स, हॉर्निया, किडनीसह इतर २००६ शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या.
बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये पाच वर्षांत तब्बल अडीचशे मुलांवर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर अपेंडिक्स, हॉर्निया, किडनीसह इतर २००६ शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या.
विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहून शरीरयष्टी सुदृढ राहावी, तसेच त्यांना आरोग्यदायी जीवन जगता यावे यासाठी २००८ पासून महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. २०१३ साली याचे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम असे नामांतर झाले. या कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा अंगणवाडीची, तर एक वेळेस शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. पाच वर्षांत जिल्ह्यातील शाळांमधील ६-१८ वर्षे वयोगटातील ३ लाख ९७ हजार १४ एवढ्या विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९१ हजार ४२० एवढ्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी १२ हजार ३२५ विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले.
यामध्ये ७७१८ मुले, तर ४६०७ मुलींचा समावेश आहे. इतर मुलांमध्ये गंभीर आजार न आढळल्याने त्यांची केवळ तपासणी करण्यात आली, तर अंगणवाडीतील ०-६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची पहिल्या सत्रात २ लाख ७५ हजार ७४३ पैकी २ लाख ३२ हजार १९३ विद्यार्थ्यांची तपासणी केली. १० हजार ७६४ विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक (बाह्य) डॉ. सतीश हरिदास, डॉ. संजय पाटील सह इतरांचे मार्गदर्शन लाभ आहे. पर्यवेक्षक आर.के. तांगडे या अभियानाचा दैनंदिन आढावा घेतात.
३९ पथके कार्यरत
या अभियानासाठी जिल्ह्यात ३९ पथके कार्यरत असून, एका पथकात महिला व पुरुष असे दोन डॉक्टर, एक फार्मासिस्ट व एक नर्स यांचा समावेश आहे. अंगणवाडी, शाळेत जाऊन ते तपासणी करतात
५४१ विद्यार्थ्यांना हृदयविकाराचा त्रास
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पाच वर्षांत ५४१ मुलांना हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाले. पैकी २५१ मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली, तर ५० विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी राजीव गांधी योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे कार्यक्रम पर्यवेक्षक आर.के. तांगडे यांनी सांगितले.
पालकांनीही पुढे यावे
अनेक वेळा आपल्याला पाल्याला वेगवेगळे आजार झालेले असताना ते भीतीपोटी बालकावर औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यास पुढे येत नसल्याचेही या अभियानातून समोर आले आहे. या अभियानात सर्व आजारांवर मोफत औषधोपचार करून शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी सर्व पालकांनी पुढे येत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आम्ही सोबत आहोत
अंगणवाडी, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. गंभीर आजार असल्याचे समजताच त्यावर तात्काळ उपचारासाठी पावले उचलली जातात. पालकांनी जागरूक राहून पाल्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. आम्ही सोबत आहोत.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.