कर्नाटकी दगडाला महाराष्ट्रात देवपण; शेकडो मूर्ती घडवणारे चार हात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 06:35 AM2023-04-25T06:35:24+5:302023-04-25T06:36:31+5:30
दोन भावंडांनी घडविल्या शेकडो मूर्ती; लाखो भक्तांचा टेकतो माथा
नितीन कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा (जि. बीड) : टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, असे म्हणतात. त्याचीच प्रचिती देत आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील दोन मूर्तिकार भावांनी कर्नाटकातून आणलेल्या दगडाला देवपण दिले आहे. त्यांच्या या मूर्तींनी राज्यभर ख्याती मिळवली आहे.
बाळासाहेब पंडित व भीमराव पंडित ही या मूर्तिकार भावंडाची नावे... दगड घडवून त्यावर कोरीव काम करून प्रपंच चालवायचा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. वडील कृष्णराव पंडित हे निरक्षर. परंतु, त्यांनी लेकरांना अक्षर ओळख येईल इतपत शिक्षण दिले. लेकरं हाताखाली येताच पाटी पेन्सिलऐवजी हाती छन्नी, हातोडा दिला. वडिलांच्या निधनानंतर सर्व जबाबदारी दोन भावांच्या खांद्यावर पडली. दिवसरात्र छन्नी, हातोड्याच्या माध्यमातून देवाच्या घडीव मूर्ती बनवणे सुरू झाले. आता त्यांच्या व्यवसायाला तीस वर्षे झाली आहेत.
बदलत्या काळानुसार मागणी वाढली. चांगल्या दगडांची मागणी होऊ लागली. मग जवळपासचा नव्हे तर कर्नाटकातून दगड आणला जाऊ लागला. त्याला छन्नी, हातोडा, कटरच्या साह्याने कापून जशी मागणी येईल त्या देवाची मनमोहक मूर्ती बनवली जाते. या घडीव व कोरीव मूर्तीला राज्यभर चांगली मागणी आहे.
दीड फुटापासून सात फुटांपर्यंत मूर्ती बनवली जाते. यासाठी २० हजार ते १ लाखांपर्यंत खर्च येतो.
- भीमराव पंडित, मूर्तिकार
नवे तंत्रज्ञान अवगत झाले असले तरी दगडी व घडीव मूर्तीला मागणी कायम आहे. दगडाला देवपण देताना मनातदेखील चांगली भावना निर्माण होते.
- बाळासाहेब पंडित, मूर्तिकार