काेरोनामुळे निधी नाही, आला तर अधिकारी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:24+5:302021-08-29T04:32:24+5:30
बीड : तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन तब्बल एक ते दोन महिने उशिराने होत असल्याने त्यांना विविध अडचणींचा ...
बीड : तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन तब्बल एक ते दोन महिने उशिराने होत असल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे शासनाकडून उशिरा येणारा निधी आणि निधी उपलब्ध झाला तर यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तत्परतेने कार्यवाही होत नसल्याने वेतन रखडल्याचे सांगण्यात येते. सध्या कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांनाही वेतन उशिरा मिळत आहे. तर सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतन प्रक्रियेत प्रशासकीय पातळीवर उदासीनता असल्याने अडचणी येत आहेत. या शिक्षकांना जुलैचे वेतन २७ ऑगस्टपर्यंत मिळालेले नाही. शिक्षण विभागासह पंचायत समितीमधील संबंधित कर्मचारी याला जबाबदार असल्याची तक्रार एस. जी. परदेशी, एस. एम. कदम, डी. एस. गायकवाड, शा. कि. पटाईत, आर. एस. काळे, ए. एल. नवले, एन. वाय सवाई, एस. डी. निसर्गंध आदींनी केली आहे. निवृत्ती वेतन अदा करण्यात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवृृत्त शिक्षकांनी दिला आहे.
------------
सेवानिवृत्त शिक्षकांचा उदरनिर्वाह त्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावरच अवलंबून आहे. वार्धक्यामुळे अनेक प्रकारचे आजार जडत आहेत. निवृत्ती वेतन वेळेवर न मिळाल्याने तसेच वेळेवर उपचार न घेता आल्याने काही निवृत्त शिक्षकांना गंभीर संकटांचा सामना करावा लागत आहे. -- बी. जी. बुंदेले, निवृत्त शिक्षक, बीड.
-----------
सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतनाची बिले पंचायत समितीमार्फत तयार करून कोषागाराला पाठविली जातात. तेथून मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे पाठविली जातात; मात्र कोरोना स्थितीमुळे शासनाकडून निधी येण्यास होणारा विलंब तसेच निधी उपलब्ध असला तर प्रक्रिया पूर्ण करणारे अधिकारी काही दिवसांच्या रजेवर गेल्यामुळे वेतन मिळण्यास उशीर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
------------