लेकीचा मृतदेह खांद्यावर घेऊन बापाने ओलांडली नदी; बीडमधील मन सुन्न करुन टाकणारी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:46+5:302021-09-25T11:57:22+5:30
- सखाराम शिंदे गेवराई : तालुक्यातील भोजगाव येथे बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. दीड वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या ...
- सखाराम शिंदे
गेवराई : तालुक्यातील भोजगाव येथे बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. दीड वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या पुलामुळे मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेताना गावकऱ्यांना कसरत करावी लागली. अक्षरश: मृतदेह खांद्यावर घेऊन नदी ओलांडून न्यावा लागला.
निकिता दिनकर संत (वय १८, रा. भोजगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११च्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने हे पाऊल का उचलले, याचे गूढ कायम आहे. मात्र, भोजगावला जोडणाऱ्या रस्त्यावरील अमृता नदीवरील पूल दीड वर्षापासून वाहून गेल्याने व सध्या मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कसा न्यायचा, असा प्रश्न होता.
अखेर गावकऱ्यांनी मृतदेह खांद्यावर घेतला व पुलाच्या उरलेल्या दीड फूट कठड्यावरून नदी पार केली. उमापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, दीड वर्षांपासून पुलाची दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात दळणवळण ठप्प होते. याबाबत आमदार ॲड. लक्ष्मण पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही.
नदीला पाणी आले की तुटतो संपर्क
अमृता नदीला पावसाचे पाणी आले की गावाचा संपर्क तुटतो. दीड फूट कठड्यावरून जीव मुठीत धरून वाट काढावी लागते. वाहने नेता येत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होते. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. २४ सप्टेंबर रोजी चक्क मृतदेह खांद्यावरून न्यावा लागल्याने गावकऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली.
अमृता नदीवरील पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग तसेच आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह मंत्रालयातदेखील निवेदन देऊन मागणी केलेली आहे. पुलाचे काम रखडल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. मृतदेह खांद्यावरून न्यावा लागणे हे कुचकामी प्रशासनाचे अपयश आहे.
- अरुणा विष्णू आडे, सरपंच, भोजगाव