बोगस खत विक्री करणाऱ्या हैदराबादच्या नवा भारत कंपनी विरुद्ध गुन्हा
By शिरीष शिंदे | Published: July 20, 2023 07:47 PM2023-07-20T19:47:44+5:302023-07-20T19:47:58+5:30
सर्व खताच्या बॅगवर संबंधित खत लिमिटेड कंपनीची संपूर्ण माहिती होती.
बीड : शासनाची परवानगी न घेता शेतकऱ्यांना बोगस खत विक्री केल्या प्रकरणी तेलंगना राज्यातील हैदराबाद येथील नवा भारत फर्टिलायझर्स कंपनीच्या संचालक मंडळासह वाशीम जिल्ह्यातील एका विक्रेत्याविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्हास्तरीय गुण नियंत्रण भरारी पथकास माजलगाव येथे बोगस खत विक्री केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन माजलगाव येथील बायपास रोडवरील नवा भारत फर्टिलायझर्स लि. कंपनीच्या रासायनिक खत विक्री केंद्राची तपासणी केली असता तेथे नवा भारत फर्टीलायझर्सने तयार केलेले सीएमएस ग्रॅन्युल्स १०.०५.१० या खताच्या ४० किलो वजनाच्या ३३८ बॅग आढळून आल्या.
त्याची एकूण किंमत ४ लाख ५ हजार २६२ रुपये किमत होती. सर्व खताच्या बॅगवर संबंधित खत लिमिटेड कंपनीची संपूर्ण माहिती होती. सदरील खताचा नुमना विश्लेषणाकरीता छत्रपती संभाजी नगर येथील खत चाचणी प्रयोग शाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असता त्या खताचा नमुना अप्रमाणित आढळून आला. या प्रकरणी बीड येथील जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक जनार्धन बाबासाहेब भगत यांच्या फिर्यादीवरुन तेलंगना राज्यातील हैद्राबाद येथील नवा भारत फर्टीलायझर्स कंपनीचे संचालक मंडळ व विक्रेता उमेश नारायण गजभार (रा.चिंचाळा हनुमान मंदिर जवळ मंगरुळपीर, जि. वाशीम) यांच्या विरुद्ध अत्यावश्यक वस्तु कायदा व खत नियंत्रण आदेश या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. तपास माजलगाव शहर पोलीस करत आहेत.