भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण; राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:20 PM2023-03-28T21:20:48+5:302023-03-28T21:21:20+5:30
महादेव सोळुंके याच्या अटकेमुळे आ. सोळंके यांच्या अडचणीत वाढ झाली असून ते आता पोलिसांच्या रडारवर आहेत.
माजलगाव : येथील भाजपाचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणात येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहाय्यक महादेव सोळंके यास पोलिसांनी केज येथे चौकशीला बोलावून अटक करून माजलगाव पोलीस ठाण्यात आनण्यात आले. या अटकेमुळे आता आ. प्रकाश सोळंके पोलिसांच्या रडारवर येऊ शकतात.
येथील भाजपाचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी आ. प्रकाश सोळुंके , त्यांच्या पत्नी मंगला प्रकाश सोळंके , उद्योगपती रामेश्वर टवाणी यांच्या विरोधात विविध संस्थेत केलेल्या भ्रष्टाचारा विरोधात न्यायालयात ३ मार्च रोजी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर ७ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी अशोक शेजुळ यांच्यावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात पाच जणांनी हल्ला केला होता. यात शेजुळ गंभीर जखमी झाले होते. शेजुळ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात आ. सोळंके पती-पत्नीवर ३०७ चा गुन्हा दाखल झाला होता.
यातील पाच आरोपींना पोलिसांनी चार ते पाच दिवसात अटक केली होती. त्यानंतर पोलीस सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांनी आमदार सोळंके पती-पत्नी सह १० ते १२ जणांची कसून चौकशी केली होती. यात आमदार प्रकाश सोळंके यांचे स्विय सहाय्यक महादेव सोळंके यास मंगळवार रोजी दुपारी तपास कामी बोलावले असता या मारहाण प्रकरणात महादेव सोळंके यांनी कबूल केल्याचे उघड होताच त्यास ५ वाजता केज येथे अटक करून माजलगाव शहर पोलिसात रात्री उशिरा आणण्यात आले. महादेव सोळुंके याच्या अटकेमुळे आ. सोळंके यांच्या अडचणीत वाढ झाली असून ते आता पोलिसांच्या रडारवर आहेत.