परळी जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणी तत्कालीन कृषी अधीक्षकाची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:58 AM2018-08-04T11:58:47+5:302018-08-04T12:20:24+5:30
याप्रकरणाशी संबंधित २५ अधिकाऱ्यांसह तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक रमेश भताने यांची एका विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येणार आहे.
बीड : परळी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात ४ कोटी ८४ लाख रूपयांचा घोटाळा झाला. याप्रकरणाशी संबंधित २५ अधिकाऱ्यांसह तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक रमेश भताने यांची एका विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. ही माहिती महाराष्ट्र काँग्रेस ओ.बी.सी. विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून कृषी आयुक्तांना एका पत्राद्वारे विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एका विशेष पथकाची नियुक्ती करुन घोटाळ्यातील तथ्य बाहेर काढण्यात येणार आहे.कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या कामांच्या चौकशीत या प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे दिसून आले होते.
या प्रकरणाशी संबंधित कृषी विभागाच्या २४ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. चौकशी पथकाने शासनाकडे सोपवलेल्या अहवालावरून कृषी विभागाने रमेश भताने यांच्यासह सर्व दोषींची महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील नियम) नुसार चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य आयुक्त कृषी आयुक्तालय, पुणे यांना दिले आहेत. या चौकशीनंतर जलयुक्त घोटाळ््यात आणखी काही बडे मासे गळाला लागतात का ? याकडे सगळ््यांचे लक्ष लागलेले आहे.
पारदर्शक चौकशीसाठी झाली बदली
बीडचे तत्कालीन कृषी अधीक्षक रमेश भताने यांची बदली लातूर येथे विभागीय कृषी सहसंचालक या पदावर झाली होती. मात्र, या प्रकरणामध्ये भताने यांची चौकशी होणार असल्याचे संकेत मिळाल्याने त्यांची बदली नाशिक येथे विभागीय कृषी सहसंचालक पदावर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.