लाच प्रकरणातील १० हजार रूपये गायब करणाऱ्या निवृत्त सहाय्यक फौजदारावर बीडमध्ये गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 07:44 PM2018-11-26T19:44:56+5:302018-11-26T19:45:31+5:30
सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार भाऊराव धोंडीराम पवार यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड : लाच प्रकरणात हस्तगत केलेली रोख १० हजार रुपयांची रक्कम गायब केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्याचे तत्कालीन मोहरीर तथा सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार भाऊराव धोंडीराम पवार यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी सायंकाळी पोलीस अधीक्षकांनी हे आदेश दिले. मुद्देमालात अफरातफर केल्याचा ठपका ठेवला आहे.
एसीबीने लाच स्वीकारताना पकडलेली रक्कम शिवाजीनगर ठाण्याच्या ताब्यात दिली. क्राईम मोहरीर म्हणून भाऊराव पवार हे होते. त्यांनी हा मुद्देमाल सुरक्षित ठेवणे अपेक्षित होते. मात्र, पाचपैकी रोख रक्कम असलेला मुद्देमाल पवार यांनी गहाळ केला. हा प्रकार निदर्शनास आल्यावर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांची चौकशी लावली. प्राथमिक चौकशीत पवार दोषी आढळले. त्यानंतर त्यांची अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्याकडे विभागीय चौकशी सोपविली.
बोराडे यांनी तीन सरकारी साक्षीदारांसह पवार यांचा जवाब व इतर पुराव्यांवरुन त्यांना दोषी ठरविले. त्यानंतर २६ आॅक्टोबर रोजी पोलीस अधीक्षकांकडे अंतिम अहवाल पाठविला. अधीक्षकांनी यावर २४ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पुर्भे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी विश्वासघात करुन सदर रकमेत अपहार करुन स्वत:साठी वापर केला. बुद्धीपरस्पर वाट लावून एसीबीचा पुरावा नष्ट केला, असा ठपका ठेवत पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार हे करीत आहेत.
काय होते प्रकरण ?
वडिलांनी विक्री केलेल्या प्लॉटच्या फेरफार नोंदणीविरोधात केलेल्या अपिलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी एका व्यक्तीने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. पैकी १० हजार रुपये स्वीकारताना त्याला १८ फेब्रुवारी २०१६ रोजी बीडच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले होते. रकमेसह त्याच्याकडून इतर मुद्देमाल जप्त केला होता. एसीबीचे पोलीस निरीक्षक जी. व्ही. वाघ यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा सर्व मुद्देमाल मोहरीर, भाऊराव पवार यांच्या ताब्यात होता.
चौकशीत दोषी
मुद्देमाल गहाळ झाल्याचे समजताच चौकशी केली. यात दोषी आढळल्याने संबंधित मोहरीरवर गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास सुरु आहे.
- जी. श्रीधर पोलीस अधीक्षक