बीडमध्ये लोकसभाप्रमाणेच विधानसभातही जातीय राजकारण; मराठा-ओबीसी यांच्यात धुसफूस
By सोमनाथ खताळ | Published: November 18, 2024 12:02 PM2024-11-18T12:02:42+5:302024-11-18T12:05:22+5:30
प्रत्येकच उमेदवारांनी मतविभाजनाचा धसका घेतल्याचे दिसत आहे.
बीड : लोकसभा २०२४ च्या निवडणूकीत जिल्ह्यात जातीय राजकारण झाले. आता विधानसभा निवडणूकीतही पुन्हा तीच परिस्थिती पहायला मिळत आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते हे मराठा-ओबीसी अशी गणीते जुळवून मतांचे राजकारण करत आहेत. सोशल मिडीयावरूनही सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून वातावरण तापू लागले आहे. लोकसभेत मतदान प्रक्रियेनंतर मराठा-वंजारा असे वाद झाले होते. आता विधानसभानंतर याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर असणार आहे.
जिल्ह्यात परळी, आष्टी, केज, माजलगाव, आष्टी आणि बीड असे सहा मतदार संघातून १३९ उमेदवार विधानसभा निवडणूक मैदानात आहेत. यामध्ये ८१ अपक्ष उमेदवार आहेत. लोकसभेला मराठा-ओबीसी अशी थेट लढत झाली होती. परंतू विधानसभेतील चित्र वेगळे आहे. प्रत्येक मतदार संघात, मराठा उमेदवार मैदानात आहेत. गेवराई मतदार संघात बदामराव पंडित, विजयसिंह पंडित, लक्ष्मण पवार हे प्रमुख उमेदवार मराठा आहेत. येथे प्रियंक खेडकर आणि मयुरी खेडकर ओबीसी म्हणून मैदानात आहेत. माजलगावात प्रकाश सोळंके, मोहन जगताप, रमेश आडसकर हे प्रमुख उमेदवार मराठा आहेत. माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे हे ओबीसी म्हणून मैदानात आहेत. बीडमध्येही संदीप क्षीरसागर आणि डॉ.योगेश क्षीरसागर हे ओबीसी उमेदवार असून अनिल जगताप, कुंडलिक खांडे, डॉ.ज्योती मेटे हे मराठा उमेदवार मैदानात आहेत. आष्टीत सुरेश धस, बाळासाहेब आजबे हे मराठा असून भिमराव धोंडे ओबीसी तर महेबुब शेख अल्पसंख्यांक आहेत. परळीत धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होत असून येथे थेट मराठा-ओबीसी लढत आहे. केज मतदार संघ राखीव आहे.
मतविभाजनाचा घेतला धसका
प्रत्येक मतदार संघात मराठा-ओबीसी उमेदवार आहेत. त्यांच्याकडून मराठा उमेदवारांकडून मराठा तर ओबीसींकडून ओबीसी मतांची गणीते जुळविली जात आहेत. प्रत्येकच उमेदवारांनी मतविभाजनाचा धसका घेतल्याचे दिसत आहे.
सभा, बैठकांमध्ये काढली जातेय जात
सध्या उमेदवारांकडून माेठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. यामध्ये प्रत्येकजण आम्ही सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जात असल्याचे सांगत आहे. याच जातीच्या मुद्यावरून अनेक भाषणे गाजली आहेत. मोठ्या सभा सोडाच, पण साधी बैठक, गाठभेट दौऱ्यातही जातीचा विषय निघत आहे.
सोशल मिडीयावर वातावरण गरम
लोकसभा मतदानानंतर सोशल मिडीयावर पोस्ट टाकल्यानेच केज तालुक्यातील नांदुरघाट येथे मराठा-वंजारा असा वाद झाला होता. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. आता विधानसभातही सध्या तशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. सोशल मिडीयावर मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त पोस्ट टाकल्या जात आहेत. यामुळे पुन्हा जिल्ह्यातील सलोख्याचे वातावरण बिघडू शकते. पोलिसांकडून नजर असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात कारवाया केल्या जात नसल्याचे दिसत आहे.