जनावरांचा बाजार बंद, व्यापाऱ्यांच्या दावणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:32 AM2021-04-18T04:32:51+5:302021-04-18T04:32:51+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जनावरांचा बाजार बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी बैलजोडी खरेदीसाठी व्यापाऱ्याच्या ...
अंबाजोगाई :
अंबाजोगाई तालुक्यासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जनावरांचा बाजार बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी बैलजोडी खरेदीसाठी व्यापाऱ्याच्या दावणीला गर्दी करत आहेत. बाजार बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांनाही बैलजोडी मिळणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे यंदा बैलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर बैलाच्या किमती गेल्याने व्यापाऱ्याच्या दावणीला बैलजोड पाहून शेतकऱ्याला रिकाम्या हाताने परतावे लागत आसल्याचे वास्तव चित्र यंदाही पाहिला मिळत आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना बैल किंवा गाय म्हैस, शेळी खरेदी करायची असेल तर रेणापूर येथे चैत्रात भरणाऱ्या बाजाराचा उल्लेख होत असतो. या बाजारात विविध जातींचे बैल विक्रीसाठी येत असतात. एका बैलजोडीची किंमत चारचाकी वाहन खरेदी करता येईल, अशा किमती बाजारात ऐकायला मिळतात. सर्वसामान्य शेतकरी हे अंबाजोगाई, घाटनांदूर, आडस, मुरुड, किनगावच्या आठवडी बाजारात बैल, दुभती जनावरे खरेदी विक्रीचा व्यवहार मोठ्या प्रमाणात करत असतात.
गुढीपाडव्यानंतर शेतकरी जनावरांच्या बाजारात उन्हाळी मशागत व पेरणीसाठी बैलाची खरेदी विक्री जास्त प्रमाणात करत असतात. अंबाजोगाई परिसरातील शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी चारा पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांसह बैल विक्री केल्याने दावणी रिकाम्या झाल्या होत्या. त्या आजही रिकाम्याच आहेत. या वर्षीची रबीची सुगी शेतकऱ्यांच्या पदरात पडली. चारापाण्याची मुबलक सोय झाली आहे; परंतु शेतकऱ्यांच्या दावणी मात्र रिकाम्याच आहेत.
चैत्र महिन्यांपूर्वी गतवर्षीप्रमाणेच कोरोनाचा हाहाकार, लॉकडाऊन, जनता संचारबंदी सुरू झाली आहे. त्यामुळे जनावरांचे बाजार बंद आहेत. शेतीच्या उन्हाळी मशागतीसाठी शेतकऱ्यांना बैलांची आवश्यकता आहे. किमतीही गगनाला भिडल्या आहेत. जनावरांचे बाजार बंद आहेत मग बैल आणायचे कोठून? - बाळासाहेब जगताप, शेतकरी.
गावोगावी फिरून करावी लागते खरेदी
व्यापाऱ्यांनी गावोगावी फिरून बैलांची खरेदी करून बैलांची जमवाजमव करत शेतात दावणीला बैल विक्रीसाठी ठेवले आहेत. ही जमवाजमव करताना त्यांची दमछाक होत आहे. बाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांनाही बैल खरेदी करावी लागत आहे, तर शेतकऱ्यांनाही व्यापाऱ्यांच्या दावणीशिवाय पर्याय नसल्यामुळे बैल खरेदीसाठी ते व्यापाऱ्यांच्या शेतातील दावणीला जात आहेत.
सध्या बाजार बंद असल्याने आम्हाला गावोगावी जाऊन आगाऊ रक्कम देऊन बैल खरेदी करावे लागत आहेत. खरेदी महाग पडत आहे. त्यांना वाहनाने आणण्यासाठीचा खर्च आहे. दावणीलाही चारा, पेंढीचा दररोजचा दोन हजार रुपये खर्च येत आहेत. एवढा खर्च करून शेतात दावण लावली; पण ग्राहकच नाहीत. बैलजोडीवर गुंतवलेलेही पैसे निघणे सध्या मुश्कील झाले आहे. - मुबारक शेख, व्यापारी
===Photopath===
170421\avinash mudegaonkar_img-20210415-wa0046_14.jpg