बीड जिल्ह्यात संशयपिशाच्च कौटुंबिक वादाचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:24 AM2018-03-20T00:24:43+5:302018-03-20T00:24:43+5:30
दोघे घटस्फोटापर्यंत जाण्याची तयारी दर्शवितात, परंतु त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांचे योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन करून त्यांचा संसार पुन्हा सुखाने सुरू करण्यात बीड पोलिसांच्या महिला तक्रार निवारण कक्षाला यश आले आहे. मागील चार वर्षांत त्यांनी १६४४ प्रकरणांमध्ये ८३९ जोडप्यांचे वाद मिटविले आहेत.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘हे नेहमी फोनवरच बोलतात’, चोरून लपून कोणाला तरी मेसेजेस पाठवितात, मला मोबाईल पाहू देत नाहीत, दुसऱ्या महिलांसोबत बोलतात, वेळेवर घरी येत नाहीत, मी विचारल्यानंतर मला काही सांगत नाहीत, लपवून गोष्टी ठेवतात, अशा एक ना अनेक कारणांमुळे घरांमध्ये पती-पत्नी यांच्यात संशय वाढत आहेत. हेच संशयाचे भूत संसार मोडण्यास कारणीभूत ठरत आहे. दोघे घटस्फोटापर्यंत जाण्याची तयारी दर्शवितात, परंतु त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांचे योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन करून त्यांचा संसार पुन्हा सुखाने सुरू करण्यात बीड पोलिसांच्या महिला तक्रार निवारण कक्षाला यश आले आहे. मागील चार वर्षांत त्यांनी १६४४ प्रकरणांमध्ये ८३९ जोडप्यांचे वाद मिटविले आहेत. कौटुंबिक वादाची कारणे शोधली असता यामध्ये सर्वाधिक वाद हे संशयातून होत असल्याचे समोर आले आहे.
महिला तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून तुटलेले संसार जोडण्याचे काम होते. महिन्यापूर्वीच या कक्षाचे ‘सखी सेल’ असे नामांतरण झाले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार ए. एस. पवार, महिला कर्मचारी विद्या चौरे, सुरेखा उगले, निर्मला मतकर, कल्पना चव्हाण आदी कर्मचारी हे काम पाहत आहेत.
कसे होते समुपदेशन ?
सुरूवातीला स्वत: पीडितेची तक्रार तिच्या हस्ताक्षरात घेतली जाते. त्यानंतर समोरच्या व्यक्तील महिला तक्रार निवारण केंद्रातून संबंधित पोलीस ठाण्यामार्फत नोटीस पाठविली जाते. ठरलेल्या तारखेला हजर राहण्यास सांगितले जाते. दोघांनाही समोरासमोर आणून त्यांची अडचण जाणून घेतली जाते. त्यानंतर त्यावर मार्ग काढण्यासाठी समुपदेशन केले जाते. त्यांना कायद्याचे मार्गदर्शन करण्यात येते. वाईट परिणामांची जाणीव करून दिली जाते. वारंवार तारीख देऊन त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही प्रकरण मिटले नाही तर संबंधित पोलीस ठाण्याला पत्र पाठवून समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले जाते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या स्वाक्षरीने हे पत्र जाते.
लग्नानंतर सहा महिन्यातच भांडणाला सुरूवात
अग्नीला साक्षी मानत सात फेरे घेऊन आयुष्यभर साथ न सोडण्याची शपथ घेणारे काही जोडपे लग्नानंतर केवळ सहा महिने ते एक वर्षापर्यंत सुखाने संसार करतात. दोघांनाही एकमेकांचे स्वभाव समजल्यानंतर त्यांच्यात जमत नाही. मग बाचाबाची होते, चिडचिड होते, रागावणे, हाणामारी असे प्रकार वाढायला लागतात. यातूनच मग ते विभक्त होण्याचा निर्णय घेतात. कक्षात आलेल्या तक्रारी या लग्नानंतर सहा महिने ते तीन वर्षे संसार केलेल्या जोडप्यांच्या आहेत.
पतीच्या व्यसनाला कंटाळल्या पत्नी
अनेकांना धुम्रपान, मद्यपान करण्याचे व्यसन असते. या व्यसनातून आर्थिक नुकसान तर होतेच; परंतु एकमेकांबद्दल द्वेष आणि राग निर्माण होतो.
रोज-रोजच्या वादाला काही पत्नी कंटाळत आहेत. अशा तक्रारींची संख्याही कक्षात मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. या कक्षामार्फत व्यसन तर सुटलेच शिवाय अनेकांचे संसारही सुरळीत सुरू झाले.
व्यसन टाळून नागरिकांनी संसारात लक्ष देण्याची गरज आहे.
सासू-सुनांचे वाद
कक्षात आलेले बहुतांश प्रकरणे ही सासू-सुनेतील वादाची आहेत. घरातील छोट्या-छोट्या कारणांवरून त्यांच्यात सतत वाद होतात. याला सून कंटाळते आणि तक्रार निवारण कक्षात अर्ज दाखल करते. यामध्ये कोंडी होते ती पतीची. नेमकी बाजू कोणाची घ्यावी असा प्रश्न त्याच्यासमोर असतो. यावेळी कक्षातील कर्मचारी या सर्वांना समोर बोलावून त्यांचे समुपदेशन करतात. एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व पटवून देतात. हे समजताच ते पुन्हा एकत्र राहून आई-मुली या नात्याप्रमाणे घरात वावरतात. सासू-सुनांचे वाद मिटवून संसार फुलविलेल्या जोडप्यांची संख्याही १०० च्या घरात आहे.
विवाहबाह्य संबंधाने त्रास
धक्कादायक बाब म्हणजे अनेक तक्रारी या विवाहबाह्य शारीरिक संबंधांच्या आहेत.
यामध्ये पतीच्या पत्नीविरोधात तर पत्नीच्या पतीविरोधात तक्रारी आहेत. ही प्रकरणे अतिशय काळजीपूर्वक हाताळून त्यांच्या मनातील गैरसमज दूर केला जातो. तसेच त्यांना गंभीर बाबींची जाणीव करून दिली जाते.
समुपदेशनानंतर त्यांचे विचार बदलतात आणि ते पुन्हा सुखाने संसार करायला लागतात.
अशा प्रकरणांची संख्याही कक्षात मोठ्या प्रमाणात आहे.
सुशिक्षितही अग्रेसर
तक्रार निवारण कक्षात सुशिक्षित व असुशिक्षित तक्रारदारांची संख्या जवळपास समान असल्याचे सांगण्यात आले. ज्यांना कायद्याचे आणि इतर गोष्टीचे ज्ञान नाही, त्यांनी तक्रार करणे ठीक आहे, परंतु उच्चशिक्षित असणारेही जर छोट्या छोट्या कारणांवरून वाद घालून विभक्त होण्याचा निर्णय घेत असतील तर ही चिंतेची बाब आहे. सुशिक्षित लोकांचेही समुपदेशन करून त्यांना घरी पाठविण्यात आले. प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक व इतर लोकांचा यामध्ये समावेश आहे. सर्वाधिक प्रकरणे ही डॉक्टर व्यवसाय असणाºयांची असल्याचे समजते.
तर ठाण्यात गुन्हा दाखल
वारंवार समजूत काढूनही, दोघांना समोर बोलावून घेत एकत्र राहण्याची विनंती करून, घडणाºया परिणामांची माहिती देऊनही अनेक जण विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम राहतात. अशांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांमार्फत संबंधित ठाण्याला पत्र पाठविले जाते. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून समोरच्याविरोधात गुन्हा दाखल केला जातो. चार वर्षांत ३६० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाद टाळून सुखाने संसार करावा
मोबाईलमुळे दोघांमध्ये गैरसमज निर्माण होतात. काही कारण नसतानाही संशय बळावतात. त्यातच लपवालपवी केल्यामुळे या संशयाला अधिक बळकटी मिळते. हे टाळण्यासाठी दोघांनीही प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करावी. तसेच व्यसन करू नये, सासू-सुनाने आई व मुलीसारखे नाते ठेवावे, पत्नीशिवाय परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये, प्रत्येक स्त्रीला आदरपूर्वक बोलावे, वर्तणूक द्यावी, महिलांनीही पुरूषांना सन्मान द्यावा, पती-पत्नीच्या नात्याला तडा जाईल, असे काही करू नये, या गोष्टी प्रामुख्याने पाळल्यास वाद होणार नाहीत. हे वाद टाळून सुखाने संसार करणे गरजेचे आहे.