पर्यावरणीय संरक्षणातून करा होळी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:19 AM2021-03-29T04:19:30+5:302021-03-29T04:19:30+5:30
बीड : होळीचा सण पर्यावरण संरक्षणातून कसा साजरा करावा, या बाबत ऑनलाईन व्हिडिओद्वारे प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी ...
बीड : होळीचा सण पर्यावरण संरक्षणातून कसा साजरा करावा, या बाबत ऑनलाईन व्हिडिओद्वारे प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विवेक वाहिनी, महिला कला महाविद्यालय बीड आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा बीडद्वारा ‘पर्यावरणीय होळी’ या विषयावर हा उपक्रम राबविण्यात आला.
होळी सण कसा साजरा केला जातो, यामध्ये काळानुरूप बदल करणे कसे गरजेचे आहे, हे प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी विद्यार्थिनींना सोदाहरण पटवून दिले. होळीसाठी होणारी लाकूडतोड आणि यामुळे होणारी पर्यावरणाची हानी, लाकडाचा कागदनिर्मितीसाठीचा उपयोग याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लाकूड, गोवऱ्यांचा इंधन म्हणून होणारा उपयोगही सर्वांसमोर मांडला. या ऐवजी कचऱ्याची होळी करणे, दुर्गुणांची, अनिष्ट रुढींची होळी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
होळीबरोबरच रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग वापरावे, रासायनिक रंगाचे दुष्परिणाम सर्वांना समजावून सांगितले. सद्यस्थितीत सर्वांनी आपली, आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, होळी सण कुटुंबीयांसोबत घरातच साजरा करावा, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शेटे यांनी केले. यावेळी विद्यार्थिनींनी कोरोना परिस्थितीत सर्वांची काळजी घेऊन घरात बसून होळी सण साजरा करण्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
होळीची पोळी गरजूंना दान करा
होळीमध्ये टाकणारा पुरणपोळीचा नवैद्य आणि असंख्य कुटुंबाची होणारी उपासमार हे समीकरण सर्वांना समजावून सांगितले. संपूर्ण पोळी होळीत न टाकता त्यातील थोडा भाग टाकावा आणि उर्वरित पोळ्या एकत्रित करून जे असंख्य बंधू-भगिनी उपाशी आहेत, गरजू आहेत अशांना होळीची पोळी दान करण्याचा संदेश या मार्गदर्शनातून देण्यात आला.