तुटपुंजी आधारभूत किंमत वाढवून केंद्राने दाखविले गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:45+5:302021-06-11T04:23:45+5:30

बीड : शेतकऱ्यांची खरी प्रगती करायची असेल तर शेतमालाच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. मात्र असे न करता केंद्र ...

The Center showed carrots by raising the meager base price | तुटपुंजी आधारभूत किंमत वाढवून केंद्राने दाखविले गाजर

तुटपुंजी आधारभूत किंमत वाढवून केंद्राने दाखविले गाजर

Next

बीड : शेतकऱ्यांची खरी प्रगती करायची असेल तर शेतमालाच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. मात्र असे न करता केंद्र शासनाने आज पिकांच्या आधारभूत किमतीत तुटपुंजी वाढ करून शेतकऱ्यांना गाजर दाखविले आहे, असा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभीषण थावरे यांनी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याने थावरे यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.

थावरे म्हणाले की, सध्या पेट्रोल, डिझेल तसेच सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत भरघोस वाढत करत आहे. यामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावात कसलीच वाढ होत नाही. याबाबत केंद्र शासनही कसलाच विचार करत नाही. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. हे माहिती असूनही याकडे केंद्र शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. हमीभावात वाढ न करता केंद्राने आज पिकांच्या आधारभूत किमतीत किरकोळ वाढ करून शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा आव आणत आहे. केंद्राने आज जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत कापसाला २११ रुपये वाढीव भाव दिला आहे. म्हणजे कापसाला ५७२६ रुपये असा भाव मिळणार आहे, तर कापूस लांब धाग्याला ६०२५ रुपये म्हणजे यात केवळ २०० रुपयांची वाढ केली आहे. केवळ शंभर, दोनशे रुपयांनी आधारभूत किंमत वाढवून शेतकऱ्यांना गाजर दाखविण्याचे काम केंद्राने केले आहे. आजघडीला कापसाची बॅग, वेचणीचा खर्च, औषधे, खतांच्या वाढलेल्या किमती पाहता कापसाला ६७२५ रुपये आधारभूत किंमत मिळायला पाहिजे. नांगरणी, मजुरी तसेच ऊस शेताबाहेर काढणे असा खर्च पाहता उसाचा एफआरपी ३८५० रुपये करा, तुरीला ६३०० असा भाव असून तो ७०५० रुपये करावा, अशी मागणी शेतकरी नेते भाई थावरे यांनी केली आहे. मात्र वर्षानुवर्षे तोच हमीभाव ठेवून आधारभूत किमतीत शंभर, दोनशे रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचे थावरे म्हणाले.

------

राज्य सरकारचे केले अभिनंदन

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मार्चमध्ये शेतकऱ्यांना तीन लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या या निर्णयाचे शेतकरी नेते भाई थावरे यांनी स्वागत केले आहे.

Web Title: The Center showed carrots by raising the meager base price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.