बहीण-भावाने केेले राखीपौर्णिमेचे शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:37 AM2021-08-24T04:37:35+5:302021-08-24T04:37:35+5:30
नितीन कांबळे कडा : एक हजारों में मेरी बहना है, सारी उमर हम संग ...
नितीन कांबळे
कडा : एक हजारों में मेरी बहना है, सारी उमर हम संग रहना है..
हे गाणे कित्येकवेळा आपण पाहिले आहे. लहानपणी अनेक भाऊ-बहीण उत्साहात राखीपौर्णिमा साजरी
करतात. मात्र बहिणीचे लग्न झाल्यावर प्रत्येक राखीपौर्णिमला बहीण-भावांची भेट होतेच, असे नाही. बऱ्याच भावंडांमध्ये राखी बांधण्याच्या कार्यक्रमात खंड पडतो. मात्र गेल्या १०० वर्षांपासून आपल्या लाडक्या भावाला राखी बांधणारी आणि उत्साहाने
तिच्याकडून राखी बांधून घेणारे बहीण-
भाऊ आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथे पाहायला मिळाले. १०१ वर्षांचे
भगवान दशरथ बोडखे यांना राखी
बांधण्यासाठी त्यांची रुईनालकोल येथील बहीण छबुबाई माणिकराव धोंडे (वय १०३) ही आजही तितक्याच
उत्साहाने आष्टी तालुक्यातील
रुईनालकोल येथून आली आणि भावाच्या हातावर राखी बांधताना राखीपौर्णिमेचे शतक या भावंडांनी साजरे केले. भगवान बोडखे यांच्या पाठीवर छबुबाई धोंडे जन्मलेल्या आहेत. छबुबाईंनी अगदी पहिल्या वर्षापासून
भगवान बोडखे यांच्या चिमुकल्या हातावर राखी बांधायला सुरुवात केली. पुढे छबुबाईंचा विवाह माजी आ. भीमसेन धोंडे यांचे चुलते माणिकराव धोंडे यांच्याशी झाला. आष्टी तालुक्यातीलच रुईनालकोल हे त्यांचे सासर असल्याने दर राखीपौर्णिमेला छबुबाई धोंडे या माहेरी येतात. त्यांना अगदीच शक्य झाले नाही, त्यावेळी भगवान बोडखे हेच बहिणीच्या सासरी जायचे. मात्र त्यांची राखीपौर्णिमा अखंडपणे एकत्रित साजरी होत राहिली. भगवान बोडखे यांनी आता वयाची शंभरी पार केल्यावरही दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झाले नाही आणि राखीपौर्णिमेच्या सणात खंड पडला नाही. त्यामुळे त्यांच्या राखीपौर्णिमेचे शतक हा आष्टी तालुक्यातील नव्हे, तर जिल्हाभरात कुतूहलाचा विषय ठरला आहे.