नातेवाईकांच्या बंदोबस्तासाठी सीईओ, एसपी काेरोना वॉर्डात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:34 AM2021-04-24T04:34:05+5:302021-04-24T04:34:05+5:30
लोकमत इम्पॅक्ट लाेकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्हा रूग्णालयातील कोरोना वॉर्डातील नातेवाईकांच्या मुक्त संचाराबद्दल ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून संसर्ग ...
लोकमत इम्पॅक्ट
लाेकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रूग्णालयातील कोरोना वॉर्डातील नातेवाईकांच्या मुक्त संचाराबद्दल ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून संसर्ग वाढण्याची कारणे निदर्शनास आणली होती. यावर प्रशासन खडबडून जागे झाले असून, शुक्रवारी सकाळीच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक स्वत: नातेवाईकांना बाहेर काढण्यासाठी कोरोना वाॅर्डात गेले. परिस्थिती गंभीर आहे. घाबरून न जाता सर्वांनीच थोडे सबुरीने घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती खूप भयानक होत आहे. रोज हजारांपेक्षा जास्त नवे रूग्ण आढळत असल्याने खाटाही अपुऱ्या पडत आहेत. औषधे, ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण होत आहे. यावर नियोजन आणि उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरूच आहे. त्यातच जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक धावपळ करत आहेत. भावना आणि प्रेमाखातर त्यांची ओढ रूग्णांकडे असली तरी त्यांच्यासह इतरांना बाहेर आल्यावर याचा सर्वाधिक धोका असतो, याचा विसर पडलेला असतो. हाच प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा, उपअधीक्षक संतोष वाळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते हे स्वत: कोरोना वॉर्डमध्ये गेले. त्यांनी सर्व वॉर्डचा राऊंड घेण्यासह नातेवाईकांना आतमध्ये जावू न देण्यासाठी सूचना केल्या. यावेळी पोलीस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती, पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका उपस्थित होत्या.
आता यापुढे पास पद्धत सुरू
ज्या रूग्णांना खरोखरच केअर टेकरची गरज आहे, अशांना पास देऊन आतमध्ये सोडावे, असे ‘लोकमत’ने सुचविले होते. याची दखल घेत आता यापुढे नातेवाईकांना पास देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या. कामाशिवाय कोणीही आत जाणार नाही, यासाठी एका पीएसआयसह पोलीस कर्मचारी मुख्य गेटवर नियुक्त केले आहेत.
आतून फोन येतोय, बाहेर नातेवाईकांची घालमेल
कोरोना वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रूग्णांकडून विविध समस्या आणि अडचणी सांगणारे कॉल्स बाहेर नातेवाईकांना येतात. त्यामुळे त्यांची आत जाण्यासाठी घालमेल असते. परंतु, परिस्थितीचे गांभीर्य पाहून प्रशासनाचाही नाईलाज असून, सर्वांनीच आता काळजी घेण्याची गरज आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सर्वांनी मिळून परिस्थितीवर मात करण्यासाठी लढा देण्याची गरज आहे.
===Photopath===
230421\23_2_bed_1_23042021_14.jpeg~230421\23_2_bed_4_23042021_14.jpg
===Caption===
जिल्हा रूग्णालयातील आढावा घेताना मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार. सोबत पोलीस अधीखक आर.राजा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते आदी.~लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रकाशित करताय यंत्रणा कामाला लागली.