धारूरमध्ये होळीपासून रंगपंचमीपर्यंत पाच दिवस चाचर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:31 AM2021-03-28T04:31:37+5:302021-03-28T04:31:37+5:30

धारूर : शहरात धूलिवंदनापासून पाच दिवस रंगांची उधळण करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. राजपूत समाजाच्या वतीने धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी ...

Chachar for five days from Holi to Rangpanchami in Dharur | धारूरमध्ये होळीपासून रंगपंचमीपर्यंत पाच दिवस चाचर

धारूरमध्ये होळीपासून रंगपंचमीपर्यंत पाच दिवस चाचर

Next

धारूर : शहरात धूलिवंदनापासून पाच दिवस रंगांची उधळण करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. राजपूत समाजाच्या वतीने धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी चाचर (फेरी) काढण्यात येते. शहिदांच्या स्मृतीला उजाळा देणारी गीते गावून रंगांची उधळण करण्यात येते. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करीत परंपरा खंडित होऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात हा सण राजपूत समाजाच्या वतीने आगळावेगळा साजरा केला जातो. या सणासाठी नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी गावी येतात. पाच दिवस थांबतात. धूलिवंदनाच्या दिवशी चाचर काढण्यात येते. यात मिश्रा, हजारी, शुक्ला, दुबे, तिवारी, सददीवाल यांचा समावेश असतो. चाचरसाठी पाच पंच नेमले आहेत. पाच दिवस चाचर साजरी केली जाते. चाचरीचा खर्च प्रत्येक दिवशी एका कुटुंबाकडे असतो. ढोलकी, झांजच्या वाद्यावर गाणी गात कटघरपुरा येथील हनुमान मंदिरापासून चाचरीला सुरुवात करण्यात येते. काशीनाथ चौकापासून सोमवार चौकातील बालाजी मंदिरापर्यंत चाचर काढण्यात येते. यावेळी ‘सिया रघुवीर बरसो एैसो, सिया रघुवीर बरसो एैसो’ अशी गीते गायिली जातात. बालाजी मंदिरात सांगता होते. सायंकाळीही चाचर काढण्यात येते. यावेळी रंगांची उधळण केली जात नाही.

धूलिवंदनाच्या दिवशी चाचर काढण्यात येते. सायंकाळी ठंडाई पिण्यासाठी अनेकांना निमंत्रण देण्यात येते. या उत्सवात दुबे, तिवारी, मिश्रा, हजारी, सददीवाल कुटुंबियांकडून चाचरीचा खर्च करण्यात येतो. सणातून एकोप्याची जोपासना करण्यासाठी राजपूत समाजातील होळी मोठा सण समजला जातो. यावेळी भेदभाव विसरून लहान-मोठे सर्वजण सहभागी होतात. शहिदांच्या स्मृतीला उजाळा दिला जातो.

प्रशासनाला सहकार्य करणार

कोरोना नियमाचे पालन करून यंदा होळी उत्सव साजरा करणार आहोत. धारूर शहरातील पाच दिवसांचा होळी उत्सव कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करताना प्रशासनास सहकार्य करणार आहोत. त्याचबरोबर उत्सव परपंरा कायम ठेवणार असल्याचे नगराध्यक्ष डाॕॅ. स्वरूपसिंह हजारी यांनी सांगितले.

चाचरनंतर जावयाची मिरवणूक

चाचर संपल्यानंतर जावयाला शोधून गाढवावर बसवून कटघरात मिरवणूक काढण्यात येते. रंग लावून नंतर सासऱ्याच्या घरी नेऊन नवे कपडे घालतात. दुपारनंतर ज्यांचा रंग असतो त्यांच्या घरी थंडाईचा कार्यक्रम असतो, या कार्यक्रमास सर्व समाजबांधवांना बोलावले जाते. सामाजिक एकतेचा मोठा संदेश देणारा येथील ऐतिहासिक होळी उत्सव शहराच्या वैभवात भर टाकणारा असल्याने परिस्थितीनुरूप हा उत्सव यंदा नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे.

Web Title: Chachar for five days from Holi to Rangpanchami in Dharur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.