"चाहुर चाहुर चांग भलं..."; पोळ्यानिमित्त कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून ग्रामगीत गात बैलांचे पूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 06:19 PM2024-09-02T18:19:52+5:302024-09-02T18:20:42+5:30
कृषिमंत्री धनंजय मुंडें यांनी जन्म गावी पोळा सण साजरा केला; मराठवाड्यातील अतिवृष्टीवर ऑनलाइन बैठकां घेत केल्या सूचना
परळी वैद्यनाथ (बीड) : कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले जन्मगाव नाथरा (ता. परळी वै. ) येथे आज शेतकऱ्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा सण पोळा साजरा केला. विशेष म्हणजे, शेतातील बैल जोड्यांचे कुटुंबीयांसमवेत पूजन करताना "चाहुर चाहुर चांग भलं, पाऊस आला घरला चला" अशा आशयाचे ग्रामगीत स्वतः धनंजय मुंडे हे गुणगुणत होते. त्यानंतर मंत्री मुंडे यांनी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीसंबंधी दोन ऑनलाइन बैठकांना मार्गदर्शन करत सूचना केल्या.
देशाच्या समृद्ध कृषी परंपरेमध्ये बळीराजाच्या सोबतीने किंबहुना बळीराजाच्या बरोबरीने कष्ट उपसणाऱ्या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा हा सण असून या निमित्ताने राज्यातील समस्त शेतकरी बांधवांना आपण शुभेच्छा देतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या प्रसंगी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे, बंधू अजय मुंडे व अभय मुंडे यांसह आदी उपस्थित होते.
बैलपोळ्याच्या निमित्ताने मराठवाड्यात बैलांची पूजा करताना पाऊस आल्याची चाहूल लागल्याचे एक खास गीत म्हटले जाते, "चाहुर चाहुर चांग भलं, पाऊस आला घरला चला" अशा आशयाचे हे ग्रामीण गीत बैलजोड्यांचे पूजन करताना स्वतः धनंजय मुंडे सुद्धा हे म्हणताना पाहायला मिळाले. यावेळी मुंडे यांनी बैलजोड्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवत त्यांच्या कष्टप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तत्काळ पंचनामे करा
दरम्यान, बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आजच कृषी विभागाच्या दोन बैठकांनाही ऑनलाईन मार्गदर्शन केले. मागील दोन-तीन दिवसापासून बीड जिल्ह्यासह राज्यात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्या नुकसानीचाही ऑनलाइन बैठकीत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मनुष्यहानी, पशुहानी होणार नाही, या पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणाना दिल्या आहेत.