‘चाकरवाडीची माऊली म्हणजे साक्षात पांडुरंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:24 AM2019-06-17T00:24:26+5:302019-06-17T00:24:59+5:30
विसाव्या शतकातील महान संत विभूती वै. ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या एकोणिसाव्या पुण्य तिथी उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने थाटात सांगता झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विसाव्या शतकातील महान संत विभूती वै. ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या एकोणिसाव्या पुण्य तिथी उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने थाटात सांगता झाली.
पुण्यतिथीनिमित्त विधिवत समाधीस अभिषेक करुन सकाळी १० ते १२ दरम्यान रामरावजी महाराज ढोक यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी आ. संगीता ठोंबरे, नंदकिशोर मुंदडा, संदिपान महाराज हासेगावकर, लक्ष्मण महाराज मेंगडे. एकनाथ महाराज लोमटे, महादेव महाराज, नारायण महाराज, प्रा.नाना महाराज कदम, प्रा.सुरेश महाराज जाधव, नवनाथ महाराज जरुड, शिवानंद महाराज गिरीसह हजारो भाविक उपस्थित होते.
महाराष्ट्रतील थोर संत गुरुवर्य दादा माऊली यांच्या पुण्यतिथी निमित्त गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची रविवारी काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांनी ‘ये दशे चरित्र केले नारायणे। रांगता गोधने राखीता हें ॥’ या काल्याच्या अभंगावर चिंतन मांडले. प्रस्तावना करतांना ज्ञानेश्वर माऊलीनी सामाजिक ऐक्य करत जाती धर्माच्या उतरंडी बाजूला सारून सर्व समाज एकत्रित केला. त्यांना अध्यात्मिक धडे दिले. प्रेमळ माऊली, दातृत्वाची मूर्तिमंत माय, भक्ताचा प्रेमाचा गाभा अशी अनेक रूपे आहेत. प्रत्यक्ष जगण्यातून आध्यात्मिक क्रांती केलेल्या संत मालिकेतील अग्रगण्य संत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात माऊली दादाची ओळख चंद्र सूर्य असे पर्यन्त राहिला असे ढोक महाराज म्हणाले.
संप्रदायात चाकरवाडी हे प्रती पंढरपूर आहे. दादा माऊली गरीब भाविक भक्त मंडळीचा विठोबा आहेत. म्हणून दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. अन्नदानासह ज्ञानदान देणारी माऊली सर्व भक्त मंडळीवर आईच्या मायेचे पांघरुण घालत होती. म्हणून तर आज हा जनसमुदाय येथे उपस्थित असल्याचे ढोक महाराज म्हणाले. यावेळी पखवाज पंडित राम महाराज काजळे, संगीत विशारद बिभीषण महाराज कोकाटे, अभिमन्यू महाराज काळे, अभिमान महाराज ढाकणे, विष्णू महाराज शेंडगे, माऊली महाराज जालना, संजय महाराज देवकर, रामकिसन देवकर व परिसरातील सर्व टाळकरी मंडळी यांची साथसंगत लाभली. काल्याच्या कीर्तनानंतर महापंगत झाली. यात ट्रॅक्टरने प्रसाद वाटप करण्यात आला. माऊली दादाच्या स्वयंसेवकांच्या कुशल व्यवस्थेने लाखो लोकांना महाप्रसाद जागेवर मिळाला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे महादेव महाराज यांच्यातर्फे शिवानंद गिरी यांनी आभार मानले