बीड शहर ‘ओडीएफ प्लस’ करण्याचे पालिकेसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:26 AM2019-09-05T00:26:37+5:302019-09-05T00:27:07+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये बीड शहर हागणदारीमुक्त करून स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. पालिकेने सर्व सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी बल्ब, पाण्याची टाकी, तोट्या, आरसे व इतर साहित्य बसवून ते सुविधायुक्त केले.
बीड : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये बीड शहर हागणदारीमुक्त करून स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. पालिकेने सर्व सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी बल्ब, पाण्याची टाकी, तोट्या, आरसे व इतर साहित्य बसवून ते सुविधायुक्त केले. मात्र, यातील बहुतांश साहित्य चोरी गेले आहे. ‘ओडीएफ प्लस’ करण्यासाठी शौचालयांचे गुण सर्वात जास्त महत्वाचे आहेत. मात्र, साहित्य चोरी गेल्याने आता ‘ओडीएफ प्लस’ शहर कसे बनवायचे, असे आव्हान बीड पालिकेसमोर आहे.
शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना आणि उपक्रम हाती घेतले जात आहेत. यातीलच एक स्वच्छ सर्वेक्षण आहे. यावर्षी शहरे हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे. यासाठी सर्वच नगर पालिका परिश्रम घेत आहेत. बीड पालिकाही मागे नाही.
बीड शहरातील ३७ सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पाण्याच्या टाक्या, तोड्या, आरसे, भांडे व इतर साहित्य बसविले आहे. मात्र, रमाईनगर व इतर शौचालयांच्या ठिकाणचे साहित्यच चोरी गेल्याचे पाहणीतुन समोर आले आहे. प्रकाशासाठी बसविलेले बल्ब तर काही तासांतच चोरी गेल्याचे समोर आले आहे. एकीकडे सुविधा दिल्या जात असताना दुसऱ्या बाजुला असे चोरीचे प्रकार घडत असल्याने शहर ‘ओडिएफ प्लस’ कसे करायचे? असे आव्हान पालिकेसमोर असणार आहे.
आष्टी, गेवराईला अचानक भेटी
पालिकांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीहून ‘क्यूसीआय’ (क्वालिटी कंट्रोल इनस्पेक्शन) समिती येणार आहे. यापुर्वी या समितीने अचानक आष्टी आणि गेवराई पालिकेची भेट देऊन तपासणीही केली आहे. बीड पालिकेचीही अचानक कधीही तपासणी होऊ शकते. सार्वजनिक शौचालयांनाच सार्वाधीक गुण आहेत. मात्र, साहित्य चोरी गेल्याने आता बीड पालिकेला ही समिती किती गुण देणार आणि समितीसमोर बीड पालिका हा सर्व प्रकार कसा मांडणार, हे वेळच ठरविणार आहे.