बीडमध्ये नवख्या गुन्हेगारांचे पोलिसांना आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:52 AM2018-04-11T00:52:21+5:302018-04-11T00:52:21+5:30
मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात चोरी, दरोडे, लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार कारागृहात असतानाही अशा घटना घडत असल्याने हे सर्व नवीन गुन्हेगार असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो आता खरा ठरत असून आतापर्यंत नवीन गुन्हेगारांच्या पाच टोळ्या पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत. परंतु तरीही गुन्हे घडतच आहे. या नवीन गुन्हेगारांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यांना पकडण्यासाठी बीड पोलीस धावाधाव करीत असल्याचे दिसते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरी, दरोडे, लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार कारागृहात असतानाही अशा घटना घडत असल्याने हे सर्व नवीन गुन्हेगार असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो आता खरा ठरत असून आतापर्यंत नवीन गुन्हेगारांच्या पाच टोळ्या पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत. परंतु तरीही गुन्हे घडतच आहे. या नवीन गुन्हेगारांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यांना पकडण्यासाठी बीड पोलीस धावाधाव करीत असल्याचे दिसते.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हा पोलीस दल दिवसरात्र गस्त घालत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून काळजी घेण्यासंदर्भात आवाहन करीत आहे. परंतु तरीही चोऱ्यांच्या घटनांमध्ये घट होताना दिसून येत नाही. चोरी झाली किंवा दरोडा पडला की स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, श्वान पथक, मुद्रण तज्ज्ञ असे घटनास्थळी जातात. घटना कशाप्रकारे घडली आहे, यामध्ये कोणी गुन्हेगाराला पाहिले आहे का? प्रत्यक्षदर्शनींनी पाहिलेल्या आरोपीचे वर्णन रेकॉर्डवरील गुन्हेगारासोबत जुळतेय का? याची खात्री केली जाते. यापैकी एकही ‘क्ल्यू’ मिळाला तरी पोलीस चोरट्यांपर्यंत सहज पोहचतात. परंतु मागील काही महिन्यांपासून चोरट्यांना शोधण्यात पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
रेकॉर्डवरील बहुतांश गुन्हेगार कारागृहात आहेत. तर काही गुन्हेगार तडीपार केले असून काहींवर एमपिडीएची कारवाई करण्यात आली आहे. अट्टल गुन्हेगारांवर मोका कारवाई करण्यात आली. या कारवायांमुळे जुन्या गुन्हेगारांमध्ये पोलिसांबद्दल दहशत निर्माण झाली आहे. परंतु नव्याने निर्माण होऊ पाहणारे गुन्हेगार पोलिसांसाठी त्रासदायक ठरत आहेत. गुन्हा केल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहे. आतापर्यंत पाच टोळ्या पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत.
या गुन्ह्यांमध्ये नवखे गुन्हेगार
बीड-गेवराई रोडवर धाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या ट्रकचालकांना लुटणारी कॉलेजकुमारांच्या टोळीला सापळा लावून गेवराई पोलीस, एलसीबी आणि एडीएसने सिनेस्टाईल पकडले होते. यामध्ये चार आरोपी होते. त्यानंतर याच मार्गावर रात्रीच्यावेळी लघुशंका किंवा इतर कामांसाठी रस्त्यात थांबलेल्या वाहनधारकांना चाकुचा धाक दाखवून लुटणारी बेलगावची टोळीही पोलिसांनी जेरबंद केली. महागडे मोबाईल चोरी करून त्यांचे आयएमईआय क्रमांक बदलून बाजारात विक्री करणारी बीडमधील टोळी सुद्धा नवखीच आहे. बीड शहरात दुचाकी पळविणाºया टोळीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तसेच एक किंवा दोन असे चोरटेही पोलिसांनी जेरबंद केले. या सर्व गुन्ह्यांतील गुन्हेगार हे ‘फे्रश’ होते. त्यांच्यावर यापूर्वी एकही गुन्हा नोंद नव्हता, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या टोळ्यांना पकडण्यासाठी पोलिसांना परिश्रम घ्यावे लागले
काय येतात अडचणी?
रेकॉर्डवरील गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत पोलिसांना बºयापैकी ज्ञात असते. परंतु नवीन गुन्हेगारांची पद्धत वेगळीच असते. तसेच प्रत्यक्षदर्शनी असलेल्या लोकांनी त्यांना पाहिले तरी त्यांचा चेहरा लक्षात येत नाही, वर्णन जुळत नाही, तसेच गुन्हेगारांची माहिती न मिळणे, हे सर्व जोडून नवीन गुन्हेगारांपर्यंत पोहचणे पोलिसांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळेच चोरी, दरोड्यांचा तपास लागण्यास थोडा उशिर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पथके दिवसरात्र तपास करीत आहेत
घटना घडली की, आम्ही सर्वजण घटनास्थळी भेट देतो. गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून असा गुन्हा कोण करू शकतो? याचे रेकॉर्ड तपासतो. जर गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगाराने केला नसल्यास शोधणे थोडे अवघड जाते. असे असले तरी आम्ही गुन्हेगारांना पकडण्यात यशस्वी ठरत आहोत. आमची पथके दिवसरात्र तपास करीत आहेत.
- घनश्याम पाळवदे, पोलीस निरीक्षक,
स्थानिक गुन्हे शाखा, बीड