बीडमध्ये आता १ लाख ३२ हजार क्विंटल तूर खरेदीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:56 AM2018-04-25T00:56:41+5:302018-04-25T00:56:41+5:30
नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदीसाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या केंद्रांवर तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या परंतु वंचित राहिलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र या कालावधीत पाच दिवस सुट्या आल्याने जवळपास एक लाख ३२ हजार २३६ क्विंटल तूर खरेदीसाठी १७ दिवसांचाच अवधी मिळणार आहे.
अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदीसाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या केंद्रांवर तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या परंतु वंचित राहिलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र या कालावधीत पाच दिवस सुट्या आल्याने जवळपास एक लाख ३२ हजार २३६ क्विंटल तूर खरेदीसाठी १७ दिवसांचाच अवधी मिळणार आहे.
१ फेब्रुवारीपासून शासनाने नाफेडच्या वतीने हमीदराने तूर खरेदीसाठी जिल्ह्यात १५ केंद्र सुरु केले होते. कधी गोदाम तर कधी बारदाना तर कधी तांत्रिक अडचणींमुळे तूर खरेदीत अडथळे आले होते. ७७ दिवसात १५ हजार ७६४ शेतकºयांची १ लाख ६८ हजार ५४४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यानंतर १८ एप्रिलपासून खरेदी बंद केली होती. त्यामुळे १८ एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या १५ हजार ७६४ शेतकºयांच्या तुरीचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करुन तूर खरेदीसाठी मुदतवाढीची गरज असल्याचे शासन व प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. अखेर देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी तूर खरेदीला मुदतवाढ दिली. हा निर्णय घेण्यास पाच दिवसांचा अवधी लागला. मुदतवाढीचे आदेश २३ रोजी सायंकाळी मिळाल्याने २४ रोजी काही केंद्रांवरच तूर खरेदी होऊ शकली. बुधवारपासून खरेदीला वेग येईल, मात्र पुरेसा बारदाणा आणि गोदामांची उपलब्धता आवश्यक आहे.
मुदतवाढीत पाच दिवस वाया
१८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद केल्याने केंद्रचालक निवांत होते. तर तीन दिवस ताटकळलेल्या शेतकºयांनी त्यांचा माल परत घरी नेला. विस्कळीत झालेली यंत्रणा सुस्थितीत आणण्यात आली. मुदतवाढीमुळे पुन्हा तूर खरेदी सुरु होत आहे.
जवळपास १६ हजार ९२५ शेतकºयांची तूर १५ मेपर्यंत खरेदी करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांपुढे आहे. तूर खरेदी वेगाने झाल्यास हे आव्हान पेलता येणार असलेतरी केंद्र सुरु झाल्यापासून गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदीची गती संथ राहिली आहे.
केंद्रांच्या अडचणी
१८ एप्रिलपर्यंत १ लाख ६८ हजार ५४४ क्विंटल तूर खरेदी झाली. त्यापैकी ९० हजार क्विंटल तूर गोदामाअभावी खरेदी केंद्रांवरच पडून आहे. मुदतवाढ मिळाली तरी खरेदी केलेली तूर कुठे ठेवायची असा पेच शिरुर, अंबाजोगाई, माजलगाव येथील केंद्र चालकांपुढे पडला आहे.