परळीसाठी चांदापूर, खडका धरणातून पाणी आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:17 AM2019-05-16T00:17:51+5:302019-05-16T00:19:21+5:30
दुष्काळामुळे यावर्षी परळी शहरात पाणीटंचाईच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी परळी नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्नशील असून नगरसेवकांनी आणि पालिकेने अधिक दक्षतेने काम करावे अशी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
परळी : दुष्काळामुळे यावर्षी परळी शहरात पाणीटंचाईच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी परळी नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्नशील असून नगरसेवकांनी आणि पालिकेने अधिक दक्षतेने काम करावे अशी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
परळीसाठी चांदापूर आणि खडका प्रकल्पातून पाणी आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.मागील वर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे परळी शहराला पाणीपुरवठा करणारे नागपूरचे धरण संपूर्णपणे कोरडे पडले आहे, मृत साठ्यातून डेड स्टॉक मधून परळीकरांना पाणीपुरवठा केला जात असून आठ दिवसाआड एकदा शहराला पाणीपुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी बुधवारी नगरसेवक व पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.
नागपूरच्या धरणात पाणी नसल्याने जवळपास ४० टँकरद्वारे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय अनेक नगरसेवक स्वखर्चाने आपल्या प्रभागातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा करत आहेत. याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
नाथ प्रतिष्ठानच्या वतीनेही गरजेप्रमाणे अधिक टँकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिले. नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करावा. शहरातील एकाही कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू देणार नाही, असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले. सद्यस्थितीत परळी शहराचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत.
पाणीबाणी : तात्पुरती पाणीपुरवठा योजना
परळी शहरालगत असलेल्या चांदापूर धरणातून तात्पुरती पाणी पुरवठा योजना करून शहराला पाणी देता येणे शक्य आहे तसेच विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणाºया खडका येथील प्रकल्पातूनही पाणी देता येऊ शकते.
या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर स्वत: मुंडे यांनी जिल्हाधिकारी, विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भातील प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्याची सूचनाही आ. धनंजय मुंडे यांनी केली.
नगरसेवकांचे धनंजय मुंडे यांनी केले कौतुक
पाणीटंचाईच्या कठीण काळात परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक अतिशय चांगले काम करत आहेत प्रसंगी स्वखर्चाने टँकर लावून आपल्या प्रभागातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा करत आहेत.
दिवसासोबतच रात्रीही दक्ष राहून प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळेल याची स्वत: काळजी घेत आहेत याचा आवर्जून उल्लेख करताना चांगले काम करणाºया नगरसेवकांचेही मुंडे यांनी या बैठकीत स्वागत केले.