वीज मीटरमध्ये फेरफार ; फौजदारी गुन्हा अन् लाखोंचा दंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:41 AM2021-09-16T04:41:04+5:302021-09-16T04:41:04+5:30
बीड : मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु ही चोरी अंगलट येऊ शकते. ...
बीड : मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु ही चोरी अंगलट येऊ शकते. मीटरमध्ये फेरफार केल्यास फौजदारी गुन्हा आणि लाखों रूपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो. अशा कारवाई ही महावितरणने चालू वर्षात केल्या आहेत. यात जवळपास २५ लाख रूपयांचा दंडही वसूल केला आहे.
शहरासह ग्रामीण भागात ग्राहकांची संख्या वाढत आहे. तसेच महावितरणकडून ही विजेचे दर वाढविले जात आहे. जास्त बिल येत असल्याने काही ग्राहक मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करतात. तसेच काही लोक विद्युत तारेवर आकडा टाकून वीज चोरी करतात. परंतु ही करणे कायद्याने गुन्हा आहे. वीज चोरी करणाऱ्यांवर विद्युत कायदा १३५ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच १२६ नुसार लाखो रूपयांचा दंडही वसूल केला जाऊ शकतो. महावितरणने चालू वर्षात अशा जवळपास ३५० कारवाया केल्या आहेत. त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात पथके नियुक्त केलेली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वीज चाेरी करू नये, असे अवाहन महावितरणने केले आहे.
---
वीज चोरीसाठी अशीही चलाखी
वीज चोरी करण्यासाठी ग्राहक चलाखी करत असल्याचे समोर आले आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर असले तरी आतील वायरचे थेट कनेक्शन केले जात आहे. तसेच मीटर केवळ लटकवून ठेवत बाजूच्या दाराने मुख्य विद्युत तारेवर आकडा टाकला जात आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक मीटरवर एकच बल्ब लावून इतर सर्व उपकरणे आकड्यावरील विजेवर चालू ठेवले जात असल्याचे प्रकार काही ठिकाणी उघड झाल्याचे सांगण्यात आले.
---
मीटरमध्ये फेरफार करणे, वीज चोरी करणे कायद्याने गुन्हाच आहे. जे ग्राहक असे करतात त्यांच्यावर विद्युत कायदा १३५ व १२६ नुसार वेगवेगळ्या कारवाया केल्या जातात. वीज चोरी रोखण्यासाठी सर्वच अभियंत्यांना सूचना केलेल्या आहेत. नागरिकांनीही वीज चोरी करू नये.
रवींद्र कोळप, अधीक्षक अभियंता, बीड
---
अशा झाल्या कारवाया (जानेवारी ते ऑगस्ट २०२१ पर्यंत)
विद्युत नियम १३५ नुसार कारवाया - १९४
विद्युत नियम १२६ नुसार कारवाया - १४९ कारवाया
दंड वसूल - २५ लाख ४० हजार