‘परिवर्तन’चा माजलगावात, ‘मैत्रेय’चा बीडमध्ये पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:47 PM2018-07-06T23:47:51+5:302018-07-06T23:49:12+5:30
जादा व्याजदराचे अमिष दाखवून करोडो रुपयांना गंडा घालणाऱ्या माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट व बीडमधील मैत्रेय प्लॉटर्स कंपनीचा आर्थिक गुन्हे शाखेने पंचनामा केला. तसेच महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जादा व्याजदराचे अमिष दाखवून करोडो रुपयांना गंडा घालणाऱ्या माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट व बीडमधील मैत्रेय प्लॉटर्स कंपनीचा आर्थिक गुन्हे शाखेने पंचनामा केला. तसेच महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर गुन्हे शाखेने तपासाला गती दिली आहे. तत्कालीन अधिकाºयांनी मात्र अद्यापपर्यंत ठेवीदारांना आश्वासने देण्यापलीकडे काहीच केलेले नव्हते. त्यामुळे संताप व्यक्त केला जात होता. सध्या आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेकडून व्यूहरचना आखली जात आहे.
माजलगाव येथील भारत अलझेंडे अध्यक्ष असलेल्या परिवर्तन मल्टीस्टेटने जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना जादा व्याजाचे अमिष दाखवून गंडा घातला. जिल्ह्यात ठिकठिकाणी संचालक मंडळावर गुन्हेही दाखल झाले. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. तत्कालीन अधिकाºयांनी ठेवीदारांना आश्वासने देण्यापलीकडे काहीच केले नाही. अखेर पूर्वीच्या अधिकाºयांची उचलबांगडी करुन तेथे नवीन अधिकारी नेमण्यात आले. या अधिकाºयांनी तीन दिवसांपासून माजलगावात तळ ठोकला आहे. परिवर्तनच्या मुख्य शाखेची झडती घेऊन हार्ड डिस्क, कॅश बुक, पॉम्पलेट व इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. तसेच २५ ते ३० जणांची चौकशी केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. संचालकांच्या घराचीही झडती घेण्यासाठी पथक गेले होते. परंतु कुलूप असल्याने रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे सूत्रांकडून समजते. पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे, उप निरीक्षक ए. एस. सिद्दीकी, एस. टी. पवार, डी. एस. चव्हाण, एम. आर. वाघ, एम. आर. वडमारे यांनी ही कारवाई केली.
पाठोपाठ बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मैत्रेय प्लॉटर्स कंपनीच्या मुख्य शाखेची झडती घेण्यात आली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. पाटील यांच्या पथकाने या शाखेचा पंचनामाही केला. मैत्रेयने जवळपास १० कोटी रुपयांना गंडा घातला असून, शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वर्षा सत्पाळकर (विरार वसई), विजय तावरे, लक्ष्मीकांत नार्वेकर, प्रसाद परळीकर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
दोन वर्षांनंतर झाला पंचनामा : ठेवीदारांमधून प्रचंड संताप
मैत्रेयवर २०१६ साली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता.
तत्कालीन अधिकाºयांनी मात्र कोणत्याही कागदपत्रांची व्यवस्थित मांडणी तसेच पंचनामा केलेला नव्हता.
अखेर नवीन रुजू झालेल्या अधिकाºयांनी मैत्रेय शाखेचा व्यवस्थित पंचनामा केला आणि तपासाला गती दिल्याचे समजते.
तत्कालीन अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, ठेवीदारामध्ये संताप आहे.