वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:07+5:302021-08-26T04:35:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : वीज बिल बचत करण्यासाठी अनेक ग्राहक मीटरमध्ये फेरफार करतात. परंतु आता हे त्यांच्या अंगलट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वीज बिल बचत करण्यासाठी अनेक ग्राहक मीटरमध्ये फेरफार करतात. परंतु आता हे त्यांच्या अंगलट येणार आहे. महावितरण पथकाने वीज चोरी पकडल्यास घरात कायमचा अंधार होऊ शकतो. आता महावितरणच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई केली जात आहे. यात फौजदारी गुन्हा अथवा दंड वसूल केला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात वीज थकबाकी असणाऱ्या ग्राहकांची संख्या लाखाच्या वर आहे. तर थकबाकीही कोट्यवधींची आहे. असे असले तरी अनधिकृत वीज कनेक्शन असणाऱ्यांची संख्याही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. महावितरणकडून वारंवार अचानक तपासणी करून वीज चोरांवर कारवाई केली जाते. मीटर असताना वीज चोरी सापडली तर त्यांच्याकडून मागील अनेक वर्षांपासूनचे बिल वसूल केले जाऊ शकते. तर जे मीटर न घेता आकडा टाकून वीज चोरी करतात, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जात असल्याचे सांगण्यात आले. आता पुन्हा नवे मार्गदर्शक नियम आले असून, यात वेगवेगळे बदल झाल्याचे सांगण्यात आले. हे सर्व नियम वीज चोरांसह बिल थकविणाऱ्या ग्राहकांसाठी आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आता काळजी घेण्याची गरज आहे.
...
फौजदारी कारवाई अन् दंड वसूल
बीड शहरातील पेठबीड भागात काही महिन्यांपूर्वी पथक वीज बिल वसुली व वीज चोरी पकडण्यासाठी गेले होते. त्या वेळी ग्राहकांनी पथकावर हल्ला केला होता. यात गुन्हाही नोंद झाला होता. तसेच काही ग्राहक सर्रासपणे आकडा टाकून वीज घेतात; त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जात आहे. मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांकडून दंड अथवा मागील कालावधीचे बिल वसूल केले जात आहे.
---
मीटरमध्ये फेरफार अथवा वीज चोरी करणाऱ्यांवर वेगवेगळ्या नियमांनुसार कारवाई केली जाऊ शकते. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांकडून मागील अनेक वर्षांपासूनचे बिल वसूल करता येऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरी करू नये तसेच थकबाकी भरावी.
- रवींद्र कोळप, अधीक्षक अभियंता, महावितरण.