बीडमध्ये प्रभारीच कारभारी; आरोग्य सेवेला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:23 AM2018-06-25T00:23:56+5:302018-06-25T00:24:24+5:30

बीड येथील जिल्हा रुग्णालयात वर्ग १ ची २० पैकी १८ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली. केवळ जिल्हा शल्य चिकित्सक आणि चर्मरोग तज्ज्ञ हीच पदे नियमित असून, बाकी सर्व विभाग हे वर्ग २ च्या तज्ज्ञांवर चालतात.

In charge of the bead; Health service | बीडमध्ये प्रभारीच कारभारी; आरोग्य सेवेला घरघर

बीडमध्ये प्रभारीच कारभारी; आरोग्य सेवेला घरघर

Next
ठळक मुद्देवर्ग एकची २० पैकी १८ पदे रिक्त

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात वर्ग १ ची २० पैकी १८ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली. केवळ जिल्हा शल्य चिकित्सक आणि चर्मरोग तज्ज्ञ हीच पदे नियमित असून, बाकी सर्व विभाग हे वर्ग २ च्या तज्ज्ञांवर चालतात. जिल्हा रुग्णालयात सध्या प्रभारीच कारभारी बनल्याचे दिसून येत आहे. यामुळे कामाला गती मिळत नसल्याने आरोग्य सेवा सलाईनवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिक्त पदे भरण्यास मात्र वरिष्ठ कार्यालय उदासीन आहे.


गत काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालय वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहे. मूल अदलाबदल प्रकरण, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू अशा कारणांमुळे तर रुग्णालयाची प्रतिमा मलीन झाली आहे. केवळ हलगर्जीपणा करणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी हक्काचा अधिकारी नसल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. परंतु अद्याप त्याला यश आले नसल्याचे दिसून येते.

जिल्हा रुग्णालयात वर्ग एकची २० पदे आहेत. यापैकी केवळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, चर्मरोग तज्ज्ञ डॉ. आय. व्ही. शिंदे हे दोघेच नियमित आहेत. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकासह इतर १८ पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. अशातच डॉ. संजय पाटील यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यामुळे नेत्र चिकित्सा विभागालाही तज्ज्ञ राहिलेला नाही. सध्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक या पदाचा पदभार डॉ. शिंदे यांच्याकडे आहे.

ही पदे आहेत रिक्त
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा. स.), भिषक, शल्य चिकित्सक, स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, क्ष - किरण शास्त्रज्ञ, शरीरविकृती तज्ज्ञ, मनोविकृती तज्ज्ञ, क्षयरोग तज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, कान - नाक - घसा तज्ज्ञ, वैद्यकीय अधीक्षक (रुग्णालय प्रशिक्षण केंद्र), मनोविकृती चिकित्सक (मनोविकृती चिकित्सा कक्ष), नेत्र शल्यचिकित्सक (अंधत्व नियंत्रण कार्यक्रम), मुख्य प्रशासकीय अधिकारी यांचा रिक्त पदांमध्ये समावेश आहे.

प्रभारी आरएमओ शिंदे देखील रजेवर
गत काही दिवसांपासून प्रभारी आर. एम. ओ. आय. व्ही. शिंदे हे देखील रजेवर गेले आहेत. त्यामुळे वर्ग २ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. हुबेकर यांच्याकडे आर. एम. ओ. पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आलेला आहे. हक्काचे आर. एम. ओ. नसल्याने खालील अधिकारी व कर्मचाºयांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. मनमानी कारभार चालवत रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार करण्यास हलगर्जीपणा केला जात आहे. डॉ. शिंदे यांनीही कारभार सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. शिंदे यांना त्यांच्या सहकाºयांकडून किती पाठबळ मिळते, हे वेळच ठरवेल.


हरिदास यांच्याकडे अनेक पदभार
निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) हे पदही वर्षभरापासून रिक्त आहे. डॉ. सतीश हरिदास यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविलेला आहे. त्यातच प्रशासकीय अधिकाºयांची बदली झाल्यामुळे त्याची जबाबदारी हरिदास यांच्याकडे दिलेली आहे. तसेच विविध गैरप्रकारांच्या चौकशाही त्यांच्याकडेच आहेत. या सर्व कामातून कर्मचाºयांवर वॉच ठेवणे त्यांना जिकिरीचे बनत असल्याचे दिसून येत आहे. यावर हरिदास म्हणाले, आरोग्य सेवा कोेलमडू न देता सर्वसामान्यांवर उपचार करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

सीएस दौ-यावर जाताच कामचुकार ‘मोकार’
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात हे शस्त्रक्रिया, तपासणी, भेट, कार्यक्रम, बैठका अशा विविध कारणांमुळे अनेक वेळा बाहेर असतात. कामचुकार अधिकारी व कर्मचारी याचा फायदा उचलतात.
सीएस दौºयावर गेल्याचे समजताच अनेक जण जिल्हा रुग्णालयांकडे फिरकत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यांच्याविरोधात तक्रार देण्यास कोणीही येत नसल्याने कारवाई होत नाही.
अशा कामचुकारांवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरु लागली आहे.

पदभरतीसाठी पाठपुरावा सुरु
रिक्त पदे असले तरी आरोग्य सेवा वेळेवर व दर्जेदार देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वर्ग एकची २० पैकी १८ पदे रिक्त आहेत हे खरे असले तरी आम्ही सेवेसाठी तत्पर आहोत. पदभरतीसाठी पाठपुरावा सुरु आहे.
- डॉ. अशोक थोरात
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

Web Title: In charge of the bead; Health service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.