‘शुभकल्याण’च्या सर्वच गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 07:38 PM2019-04-04T19:38:13+5:302019-04-04T19:41:12+5:30
शेकडो ठेवीदारांना गंडा घालणाऱ्या गुन्ह्याचा तपास पूर्ण
बीड : जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या कळंबच्या शुभ कल्याण मल्टीस्टेट विरोधात जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यांचा तपास करून दहाही गुन्ह्यांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
दिलीप आपेट अध्यक्ष असलेल्या शुभकल्याण मल्टीस्टेटचे जिल्ह्यात सर्वत्र जाळे निर्माण झाले होते. ठेविदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून त्यांनी करोडोंचा गंडा घातला. वारंवार मागणी करूनही ठेविदारांना पैसे परत मिळत नसल्याने ते आक्रमक झाले. सुरूवातीला तक्रारी केल्या. नंतर जिल्ह्यातील बीड, गेवराई, आष्टी, नेकनूर, माजलगाव, केज या तालुक्यात दहा गुन्हे नोंद झाले होते. आगोदर पोलीस ठाणे स्तरावर या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर पुन्हा हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.
सुरूवातीला तपास कासवगतीने सुरू होता, मात्र, नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी पदभार स्विकारताच सर्व गुन्ह्यांचा ‘अ’ पासून तपास सुरू केला. पंचनामा, जबाब, पुरावे हस्तगत करून बँक शाखांना सील केले. याबरोबरच दिलीप आपेटलाही बेड्या ठोकल्या. दरम्यान, सर्व पुरावे जमा झाल्यानंतर शिंदे यांनी दहाही गुन्ह्यांमधील दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे.
बीडमध्ये सात गुन्हे
माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन पतसंस्थेनेही जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात जिल्ह्यात सात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. विजय अलझेंडे हा या पतसंस्थेचा अध्यक्ष आहे. दरम्यान, बीडच्या शिवाजीनगर ठाणे व माजलगाव शहर ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन त्याचेही दोषारोपपत्र दाखल केले आहे. पोनि. प्रशांत शिंदे व सपोनि. व्ही.एस.पाटील यांनी या गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला आहे.
शुभकल्याणच्या दहाही गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तसेच माजलगावच्या परिवर्तनच्याही दोन गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले आहे. इतर गुन्ह्यांचाही तपास अंतिम टप्यात असून लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाईल.
-प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड