‘त्या’ दोन मुख्याध्यापकांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:01 AM2018-10-18T00:01:23+5:302018-10-18T00:03:24+5:30
बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी बीडमधील मिल्लिया प्राथमिक विद्यालयाच्या दोन मुख्याध्यापकांविरोधात बीडच्या प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे राजकीय वर्तूळासह बीड शहरात चर्चेला उधाण आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी बीडमधील मिल्लिया प्राथमिक विद्यालयाच्या दोन मुख्याध्यापकांविरोधात बीडच्या प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे राजकीय वर्तूळासह बीड शहरात चर्चेला उधाण आले आहे. नगरसेवकाच्या बोगस प्रमाणपत्राबद्दल विरोधकांनी चांगलाच आवाज उठविल्याने हे प्रकरण गंभीर बनत आहे.
शेख मुखीद लाला यांनी प्रभाग क्र.१६ मध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे जातीचे प्रमाणपत्र बोगस आहे, असा आक्षेप अशफाक इनामदार यांनी घेतला होता. यावर मुखीद लाला व त्यांचे चार भाऊ यांचे जुल्हा जातीच्या प्रमाणपत्राची संचिका न मिळाल्यामुळे मुखीद लाला व त्यांचे चार भाऊ यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विलास वरेकर, ई-सेतु चालक यांनी ५ जुलै २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. यावर पोलिसांनी तपास केला असता शाळेच्या मूळ रेकॉर्डमध्ये खाडाखोड केल्याचे समोर आले आहे. जात प्रमाणपत्र हे १८ आॅगस्ट २०१६ रोजीचे होते व शेख मुखीद यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जी संचिका दाखल केली त्या संचिकेमध्ये निर्गम उतारा, दाखला हे एक महिन्यानंतरचे असल्याचे दिसून आले.
या सर्व प्रकरणाच्या तपासात मोहमद मुजाहेद हसमोद्दीन सिद्दीकी व शेख महम्मद अखिल या दोन्ही मुख्याध्यापकांनी सदर उताऱ्यावर चुकीची जातीची नोंद करुन दिली असल्याचे समोर आले. तसेच शेख अब्दुल मुखीद शेख रज्जाक, शेख जब्बार शेख रज्जाक, शेख गफार शेख रज्जाक, शेख ईलियास शेख रज्जाक, शेख सत्तार शेख रज्जाक यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
मुखीद लाला यांच्या भावाचे प्रमाणपत्र हस्तगत
शेख मुखीद लाला यांचा एक भाऊ शेख ईलियास यांचे मुळ रेकॉर्डवर बागवान या जातीची नोंद असून त्यांनी देखील जुल्हा जातीचे प्रमाणपत्र हस्तगत केले आहे. त्यामुळे सदर मुळ रेकॉर्ड पोलीस ठाण्यात जमा आहे. दोन्ही मुख्याध्यापकांना हे प्रकरण महागात पडले असून सदर मुख्याध्यापकांनी सेवानिवृत्तीच्या अगोदरच स्वेच्छा निवृत्ती घेतली असून त्यांची पेन्शन देखील थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.