कोरोना काळात स्वस्ताची लग्नसराई, 150 रुपयांत शुभ मंगलमं सावधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 12:30 PM2022-02-10T12:30:29+5:302022-02-10T12:31:41+5:30
साधेपणाने अत्यल्प खर्चात कायदेशीर विवाह म्हणून नोंदणी विवाह महत्त्वाचा ठरतो. यासाठी विवाह नोंदणी शुल्क केवळ दीडशे रुपये आहे.
बीड : जिल्ह्यात मागील वर्षभरात ११५ नोंदणी विवाह झाले असून जानेवारी २०२२ मध्ये ११ नोंदणी विवाह झाले आहेत. येथील सहदुय्यम निबंधक वर्ग-१ तथा विवाह नोंदणी अधिकारी कार्यालयात स्पेशल मॅरेज ॲक्ट १९५४ नुसार नोंदणी विवाह होतात. नोंदणी विवाहासंदर्भात वयाचा पुरावा आणि अर्ज दाखल केल्यानंतर नोटीस प्रक्रिया होते. मुलगा व मुलगी सज्ञान असल्यामुळे येणारे आक्षेप निरर्थक ठरतात. कोरोनामुळे मोठ्या विवाह सोहळ्यांवर निर्बंध आलेतरी नोंदणी पद्धतीने झालेल्या विवाहांची संख्या कमीच दिसते. साधेपणाने अत्यल्प खर्चात कायदेशीर विवाह म्हणून नोंदणी विवाह महत्त्वाचा ठरतो. यासाठी विवाह नोंदणी शुल्क केवळ दीडशे रुपये आहे.
नोंदणी विवाह कोणत्या महिन्यात किती?
महिना नोंदणी विवाह
जानेवारी १८
फेब्रुवारी ६
मार्च १३
एप्रिल ०३
मे ०६
जून ०४
जुलै १९
ऑगस्ट १३
सप्टेंबर १३
ऑक्टोबर ०२
नोव्हेंबर ०९
डिसेंबर ०९
ऑनलाईन अर्ज करा, ९० दिवसांत तारीख
नोंदणी विवाहासाठी मुलगा व मुलीची संमती तसेच त्यांच्या वयाचा पुरावा सादर करून ऑनलाईन अर्ज करता येतो. एकाच जिल्ह्यातील मुलगा व मुलगी असेल तर नोटीस शुल्क पन्नास रुपये लागतात. दोघांपैकी एक दुसऱ्या जिल्ह्यातील असल्यास ५० रुपये आणखी शुल्क लागते. योग्यरित्या पूर्ततेनंतर ३० दिवसांची नोटीस असते.
नोंदणी विवाहाचा खर्च दीडशे रुपये
स्पेशल मॅरेज ॲक्ट १९५४ नुसार नोंदणी विवाहासाठी निर्धारित शुल्क भरून महिनाभराची नोटीस काढली जाते. त्यानंतर ९० दिवसांच्या आत विवाह करावा लागतो. शासनाने अधिकार प्रदान केलेले अधिकाऱ्यांसमोर नोंदणी विवाह होतो. यासाठी १५० रुपये शासकीय शुल्क भरणा करावा लागतो, असे सहदुय्यम निबंधक तथा विवाह नोंदणी अधिकारी बालाजी दारेवार यांनी सांगितले.
२०२०-२१ मध्ये झाले केवळ ८० नोंदणी विवाह
२०२०-२१ मध्ये जवळपास ८० विवाह शासकीय प्रक्रियेनुसार नोंदणी पद्धतीने झाले. तर जानेवारी २१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत एकूण १२६ विवाह नोंदणी पद्धतीने झाले आहेत.